नवी मुंबई : बेलापूर सीबीडी येथील सेक्टर १५ येथील ५ हजार चौरस मीटरच्या भूखंड क्रमांक ४२, ४३ येथील अकरा मजली आलिशान व्यावसायिक इमारतीच्या उभारणीमध्ये भांडवलदारानेच विकसकांची फसवणूक केल्याचा गुन्हा सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी नोंदविण्यात आला.
या इमारतीची निर्मिती करणाऱ्या ‘क्रिएटिव्ह होम्स’ या बांधकाम कंपनीच्या विकसकांनी श्रीगोपाल जुगलकिशोर बारासिया यांच्यावर तब्बल १७५ कोटींची फसवणूक केली असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नवी मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन गवळी यांच्या पथकाने चार महिन्यांपासून या तक्रारी अर्जाची सखोल चौकशी केल्यानंतर या प्रकरणी बारासिया यांनी फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्याने हा गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार नरेंद्र रामजियानी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या सहभागीदारांनी २००५ मध्ये सिडकोकडून निविदा प्रक्रियेतून भूखंड क्रमांक ४२ व ४३ मिळवला. भूखंड ताब्यात घेण्यासाठी सिडकोला भराव्या लागणाऱ्या उर्वरित रकमेसाठी सप्टेंबर २००५ मध्ये गोपाल बारासियांकडून सुमारे १ कोटी कर्ज स्वरूपात घेण्यात आले. त्यानंतर बारासियांनी सिडकोकडे दोन्ही भूखंडाची तब्बल १३ कोटींहून अधिक रक्कम भरून २००७ मध्ये त्यांच्या नावावर भूखंड हस्तांतरित करुन घेतला.
बांधकामासाठी लागणारी साधारण २२ ते २५ कोटी रक्कम मात्र ‘क्रिएटिव्ह होम्स’ कंपनीनेच पुरवली. २००८ ते २०११ दरम्यान ११ मजले इमारतीचे संरक्षित बांधकाम पूर्ण होताना, बारासियांनी वारंवार तोंडी भागीदारीच्या वचनांवरून करार करण्यासाठी टाळाटाळ करत होते. २०१५ मध्ये ९०% काम पूर्ण झाल्यावर उर्वरित खर्चासाठी त्यांनी ३.६ कोटी रुपये मागितले; त्यातून केवळ १.७ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यानंतर बांधकामाच्या अटी पूर्ण न करता त्यांनी संपूर्ण बांधकामावर ताबा मिळवला. नरेंद्र यांच्यासह इतर सहभाग धारकांना साशंकता वाटू लागल्याने त्यांनी रिअल इस्टेट नियमन प्राधिकरणाच्या (रेरा) संकेतस्थळावर या इमारतीबद्दलची कागदपत्र तपासल्यानंतर त्यांना दोन करारांवर फक्त एक भागीदार तुलसीदास पटेल यांच्या सह्या असून इतर सहभागींच्या सह्या दिसल्या नाहीत.
२०१७ मध्ये बारासियांनी सिडकोकडे ‘रिवॅलिडेशन ॲग्रीमेंट’ दाखल केले. त्यामुळे इतर सहभाग धारकांची अजून चिंता वाढली. २०२१ मध्ये ‘क्रिएटिव्ह होम्स’ कडून इमारतीचे अधिवास प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही बारासियांनी विकास करार न करता आपण आधीचा खर्च सुद्धा परत घेऊ अशी भूमिका घेतली. ७४ कोटी रुपयांचा खर्च तसेच बाजारभावानुसार पुढील विक्रीतून होणाऱ्या नफ्यामध्ये वाटपात ५०-५० टक्क्यांची भागीदारी न दिल्याने अखेर नरेंद्र व इतर सहभागी धारकांनी १७५ कोटींची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली.
दरम्यान, बारासिया यांनी या इमारतीमधील गाळे अनेकांना भाडेतत्वांवर दिले आहेत. इमारतीच्या प्रवेशद्वारावर तळमजल्याच्या गाळ्यात माजी आमदार संदीप नाईक यांचे संपर्क कार्यालय मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सुरू आहे. नाईक यांच्यासह इतर मोठी दुकाने येथे सुरू झाली आहेत.
बेलापूर येथील सेक्टर १५ येथील भूखंड क्रमांक ४२,४३ येथी इमारत बांधकाम करणारे विकसक व त्यांना भांडवल पुरविणारे यांच्या व्यवहारासंदर्भात जानेवारी महिन्यात अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्यानंतर पोलीस पथकाने याबाबत सखोल चौकशी केल्यावर तक्रारदार व ज्यांच्याविरोधात तक्रार आहे अशांकडून या संदर्भात त्यांची बाजू ऐकून घेतली. या प्रकरणी सध्या सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.- भाऊसाहेब ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, नवी मुंबई