नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिकेच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा झाला असून रक्तदान करण्याचे आवाहन वैद्यकीय समाजसेवक करीत आहेत. ओ पॉझिटिव्ह सारखे दुर्मिळ रक्त पूर्ण संपले असून सध्या रक्तासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना भटकावे लागत आहे.

नवी मुंबई महानगर पालिका वाशी से १० येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात रक्ताचा तूटवडा आहे. दिवाळीची सलग सुट्टी असल्याकारणाने, कॉलेज बंद असल्यामुळे रक्ताची कमतरता भासत आहे. त्यात सुट्ट्या असल्याने रक्तदान शिबीर आयोजित केले जात जात नाहीत. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात थॅलोसेमिया, अपघात, कॅन्सर, प्रसूती अशा अनेक कारणांनी रक्त रोज लागते.

रुग्णालयात विविध शास्त्रक्रिये दरम्यान हि अचानक रक्ताची गरज भासत असल्याने अगोदर रक्त तयार ठेवले जाते. मात्र अशा शस्त्रक्रिया करताना रक्त पुरवठा बाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. यासाठी तरी सर्व नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते ,संस्था ,संघटना ,राजकिय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी स्वतः नवी मुंबई मनपा प्रथम संदर्भ रुग्णालय वाशी येथील रक्तपेढीत येवून रक्तदान करा,इतरांना रक्तदान करण्याबाबत प्रोत्साहित करा आणि अमूल्य जीव वाचवा. असे आवाहन नवी मुंबई मनपा प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय समाजसेविक करत आहेत.

सरीता खेरवासीया ( वैद्यकीय समाजसेविका ) : मनपा रक्तपेढीत रक्त कमी असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना पायपीट करावी लागत आहे. सध्या रुग्णांना रक्त हवे असल्यास रक्तदाता शोधावा लागत असून अत्यंत निकड असेल तर बदली रक्तदाता शोधला जात आहे. आम्ही सर्वांना रक्तदान करावे असे आवाहन करीत आहोत.

प्रसाद अग्निहोत्री (रुग्णसेवक) : मनपाने रक्तदान जागृती साठी अधिक पुढाकार घेणे आवश्यक आहे. जॉगिंग ट्रक, मॉल, मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायटी, उद्याने बस डेपो , अशा ठिकाणी अधिक जनजागृती आवश्यक आहे. रक्तदान केल्याने केवळ रुग्णांना फायद्याचे नाही तर रक्तदात्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे. सुट्ट्यात हा तुटवडा जाणवत असल्याने त्या अनुशंघाने पाऊले उचलणे गरजेचे. राजकीय पक्षांनी अशा काळात रक्तदान शिबीर आयोजित करणे आवश्यक आहे.

डॉ. राजेश म्हात्रे (वैद्यकीय अधिकारी प्रथम संदर्भ रुग्णालय) : सलग सुट्ट्या असल्याने रक्तदान कमी आहे. ओ पॉसिटीव्ह सारखे दुर्मिळ गटाचे रक्त उपलब्ध नाही. आम्ही मनपा रुग्णालय तर्फे नागरिकांना रक्तदानाचे आवाहन करीत आहोत. तसेच रक्त नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतले जाऊ नये याची काळजी घेतली जात आहे.