उरण : सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर सोमवारी बोकडवीरा ग्रामस्थांनी धडक दिली. उरण पनवेल मार्गावरील हाईट गेट हटवावे व गेटमुळे अपघात झालेल्यांना नुकसानभरपाई द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मागण्यांवर सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग यांच्यात पाच तास सकारात्मक चर्चा होऊन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

उरण पनवेल मार्गावरील फुंडे हायस्कुल जवळ येथील हाईट गेटला धडकल्याने टेम्पोचा अपघात झाला आहे. या अपघाताच्यावेळी टेम्पो मागे असलेल्या दुचाकीवरील बोकडवीरा गावातील अंकुश पाटील व त्यांची सात वर्षाची मुलगी मनविता यांचाही अपघात झाला. या अपघातात बापलेक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सिडकोने आर्थिक मदत करावी तसेच अपघातांना जबाबदार असलेले हाईट गेट मोकळे करावेत या दोन प्रमुख मागण्यांसाठी बोकडवीरा ग्रामस्थांनी सिडकोकडे मोर्चा काढला होता.

हेही वाचा : नवी मुंबई : आयसीएससीई इंग्रजी शाळेत ना.धों. महानोर यांच्या कवितांचा काव्यारंग रंगला

हाईट गेटमुळे या मार्गावर झालेला आता पर्यंतचा १९ वा अपघात आहे. अशा प्रकारच्या बोकडवीरा येथील हाईट गेटच्या टेम्पो अपघातात कोट गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे वाढत्या अपघातामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवासी व नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच एसटी व एन. एम. एम. टी. सारखी प्रवासी वाहने ही बंद असल्याने बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे या गावातील विद्यार्थी आणि कामगारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत.

२०२१ पासून सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालय व फुंडे स्थानकालगतच्या नादुरुस्त खाडी पुलामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील जड व प्रवासी वाहने रोखण्यासाठी उरण पनवेल मार्गावर हाईट गेट बसविले आहेत. या बोकडविरा व फुंडे महाविद्यालयाजवळील दोन्ही बाजूच्या हाईट गेटमुळे अधिक उंचीच्या वाहन चालकांना उंचीचा अंदाज न आल्याने वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत.

हेही वाचा : खेलो इंडिया वुमन्स लिग पिंच्याक सिलॅट स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंचे वर्चस्‍व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच तासांच्या बैठकीत सिडकोचे अधिकारी हनुमंत नहाने, एम एम मुंढे, नायब तहसीलदार बी. जी. धुमाळ, वाहतूक उप निरीक्षक संजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरेश पवार आदी विभागाचे अधिकारी व बोकडवीरा ग्रामपंचायत सरपंच अपर्णा मनोज पाटील, कामगार नेते भूषण पाटील, विजय पाटील, संतोष पवार यांच्यासह माजी सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.