नवी मुंबई : शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा करण्याकरिता महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. त्यादृष्टीने आवश्यक वाढीव पाणी हे पाताळगंगा नदीतून तसेच भिरा येथील टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती केल्यानंतर विसर्ग होणाऱ्या अवजलामधून उपलब्ध होणेबाबतचा प्रस्ताव महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्याकडे पाठविला आहे. याद्वारे शहराची पाण्याची वाढती गरज भागविली जाणार आहे. नवी मुंबई शहराला २०५५ मध्ये नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ११७५ दशलक्ष लिटरची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेने भिरा प्रकल्पातील पाण्यावर दावा केला आहे.

सध्या मोरबे धरणातून नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नवी मुंबई शहराजवळच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच शिवडी-न्हावा-शेवा अटल सेतू, सिडकोमार्फत राबविण्यात येणारी सामुहिक गृहनिर्माण योजना यांसारख्या विविध पायाभूत विकास प्रकल्पांची उभारणी होत आहे. त्याचप्रमाणे पालिका क्षेत्रात सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारती तोडून पुनर्विकासाची कामेही शहरात सुरू आहेत. शासनाने ठाणे जिल्ह्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत नव्याने समावेश झाल्याने शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाण्याच्या मागणीतही वाढ होणार आहे. सन २०५५ पर्यंत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ४४.२० लक्ष इतक्या वाढीव लोकसंख्येस साधारणत: ११७५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे.

हेही वाचा – राज्याची नव्हे देशाची निवडणूक ;२०२९ ला भाजपचा मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

नवी मुंबई महापालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्याकरिता नवीन जलस्रोत शोधण्यासाठी प्राथमिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. तसेच पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती गठीत केली आहे. समितीने नवीन जलस्रोत निर्मितीकरिता कार्यवाही करणे संयुक्तिक राहील असे सुचविले होते. त्या अनुषंगाने पालिकेने नेमणूक केलेल्या सल्लागाराने नवीन जलस्रोतासाठी प्राथमिक संकल्पना अहवाल सादर केला होता. आयुक्त तथा प्रशासक यांची ११ सप्टेंबर २०२४ रोजी ठरावास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.

पाताळगंगा नदीतून व भिरा येथील टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मिती केल्यानंतर विसर्ग होणाऱ्या पाण्यामधून पालिका क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध होण्याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांचे कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठविला आहे. या प्रस्तावास कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची तत्वत: मान्यता प्राप्त होताच पुढील अनुषंगिक कार्यवाही करणे पालिकेस शक्य होणार आहे.

हेही वाचा – नवी मुंबई, पनवेल उरण मतदारसंघात संशयास्पद ८५ हजार दुबार मतदार

पालिका क्षेत्राचा भविष्यातील विकास आणि वाढणारी संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन पालिकेने आवश्यक पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने गतिमान पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भिरा प्रकल्पातील विसर्ग होण्यावर पालिकेचा दावा कायम आहे. याबाबत शासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकत्रित पाणी आणूनच पाणीपुरवठा शक्य

महामुंबईसाठी भिरा प्रकल्पातील ऊर्जा निर्मितीनंतरच्या पाण्यावर नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिकेबरोबरच सिडकोही दावा करत असून ९० कि.मी. अंतरावरून पाणी आणण्यासाठी या सर्व आस्थापनांनी एकत्रित पाणी आणल्यास त्याचा सर्व महापालिकांना त्याचा फायदा होणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.