नवी मुंबई : दोन आठवड्यापूर्वी मित्राशी झालेले भांडणे मिटवण्यासाठी म्हणून जेवणाच्या निमित्ताने बोलावून त्याची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच असाच प्रकार पुन्हा घडला आहे. नवी मुंबईतील करावे गावात राहणाऱ्या एकमेकांच्या परिचित युवकांचे काही वाद झाले. हे वाद मिटवण्यातही एका पडीक इमारतीत बोलावून त्याला बेदम मारहाण करीत चाकू हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन युवती सह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील तुर्भे येथे दोन आठवड्या पूर्वी दोन मित्रात वाद झाले होते. हे वाद मिटवून पुन्हा नव्याने संबंध प्रस्थापित करण्यासाठी म्हणून भांडण झालेल्या मित्राला जेवणाचे आमंत्रण देण्यात आले. झाले गेले विसरून जाऊ म्हणून तो मित्र त्या ठिकाणी गेला मात्र ज्यांनी बोलावले त्यांनीच त्याला बेदम मारहाण करीत चाकूने हल्ला केला यात उपचार दरम्यान ती व्यक्ती चार दिवसांनी मृत पावली. या प्रकरणी संशयित आरोपींना अटक हि करण्यात आलेले आहे.

हि घटना ताजी असतानाच अशीच दुसरी घटना एनआरआय पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. करावे गावात राहणारे सुमित आणि इसराईल इसाक शेख हे दोघे मित्र आहेत. काही दिवसापूर्वी दोघांचे वाद मोबाईल साथीच्या झालेल्या पैशाच्या देवाण घेवाणीतून झाले होते. दोघे एकमेकांशी बोलत हि नव्हते. मात्र सुमित याने इसराईलशी संपर्क करून भांडणे मिटवून टाकू असे सांगत बोलणी करण्यासाठी बोलावले. यासाठी त्यांनी २४ तारखेला संध्याकाळी साडे सात वाजता सेक्टर ३६ येथील स्काय या पडीक इमारतीत भेटण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार इसराईल हा त्या ठिकाणी वेळेत आला. शेवटी चर्चा सुरु असताना सुमित याने अचानक लपवून ठेवलेला जवळचा चाकू बाहेर काढून इसराईल याच्या पाठीवर मानेवर सपासप वार केले. हे होत असताना सुमित याच्या बहिणी गौरी , संगीता आणि अमोल यांनी इसराईल याला मारहाण केली.

त्याला मारहाण करून संशयित आरोपी पळून गेले. इकडे इसराईल याने इमारतीतून बाहेर पडून नातेवाईकांना फोन केले. नातेवाईकांनी त्याला मुंबईतील जे जे रुग्णालयात त्याच दिवशी दाखल केले. मात्र तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याने नेमके काय घडले कोणी केले याबाबत पोलिसांना माहिती घेणे शक्य झाले नाही. सोमवारी तो बोलण्याच्या मनस्थितीत आल्यावर त्याचा जवाब घेत एनआरआय पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप संशयितांना अटक करण्यात आलेली नसून शोध सुरु आहे. अशी माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी माहिती दिली.