नवी मुंबई : वाशीतील पाम बीच रोडवर मंगळवारी (२९ जुलै) सकाळी आठच्या सुमारास भरधाव डंपर आणि खासगी कारची भीषण धडक होऊन दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातात जगदीश लोहार आणि त्यांचा मुलगा राज हे जखमी झाले असून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एपीएमसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश लोहार हे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आपल्या मारुती-सुझुकी बलेनो कारने जात असताना त्यांनी वाशीच्या सतरा प्लाझा सिग्नलवरून शाळेच्या दिशेने वळण घेतले. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि डंपरने कारला जोरदार धडक दिली. धडकेमुळे कार काही मीटरपर्यंत फरफटत गेली.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की कारचा उजवीकडील भाग पूर्णपणे चुरडून गेला होता. तर संबंधित डंपर रस्त्याच्या शेजारी असलेल्या जलवाहीनीच्या अवघ्या काही मीटर अंतरावर येऊन धडकला. यात डंपरच्या समोरील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. तर जलवाहिनीला कोणतेही नुकसान न झाल्याने मोठा धोका टळला आहे.
या अपघातानंतर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात निष्काळजीपणे आणि अतिवेगाने वाहन चालवून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चालक अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होता का, याची चौकशी सुरू आहे.
“अपघात सकाळच्या सुमारास झाला. मुलाला शाळेत सोडण्याचा वेळी जगदीश यांनी उजवीकडे वळण घेताना डावीकडून कोपरीगावच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने त्यांना उडवले. यात दोघेही पिता-पुत्र किरकोळ जखमी झाले. दोघांवरही एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.” – अजय शिंदे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी पोलीस ठाणे</strong>
दरम्यान, पाम बीच रोडवरील हे अपघाताचे केवळ एक प्रकरण नसून गेल्या तीन दिवसांत हा तिसरा अपघात आहे. सोमवारी (२८ जुलै) पहाटे दोनच्या सुमारास बेलापूरकडून वाशीच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी मर्सिडीज गाडी दुभाजकावर आदळली. गाडीने चार आपट्या घेत लोखंडी बॅरिकेड्स तोडले आणि विरुद्ध दिशेच्या मार्गावर घुसली. या अपघातात चालक सलमान शेख (वय २०) आणि सुफियान शेख (वय २०) गंभीर जखमी झाले. गाडीचा चक्काचूर झाला होता.
यानंतर, रविवारी (२७ जुलै) रात्रीच्या सुमारास पामबीच रोडलाच नेरुळ परिसरात एका ब्रेझा कारने झाडावर धडक दिल्याची घटना घडली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांत पाम बीच रोडवर अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
पाम बीच रोड हा वाशी ते बेलापूरदरम्यानचा सुमारे ९ किमीचा मार्ग असून तो शहरांतर्गत असला तरी महामार्गासारखा सरळ व रुंद आहे. परिणामी, चालकांना वेगात गाडी चालवण्याचा मोह होतो. प्रशासनाने या मार्गावर वेगमर्यादा ६० किमी प्रतितास निश्चित केली असून रस्त्यावर ठिकठिकाणी फलक, रम्बलर आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक चालक या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळते. तर, अनेकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी पोलिसांकडून पामबीच रोडवर गस्त नसल्याने वाहन चालकांना कायद्याचा धाक उरला नाहीए. यातूनच बेफिकिरीने गाड्या वेगात चालवून वाहन चालक अपघातांना आमंत्रण देत आहेत.
स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि वाहतूक पोलिसांनी वारंवार वेगमर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळात “नो एंट्री फॉर हेवी व्हेईकल्स” हा निर्बंध लागू करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
वाहनचालकांची बेफिकिरी, स्थानिक यंत्रणांकडून अपुऱ्या अंमलबजावणी आणि रस्त्याच्या रचनेमुळे पाम बीच रोड आता अपघातांचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून या मार्गावरील अपघातांना लगाम घालणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.