पनवेल – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर नामकरणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “आमच्या दृष्टीने हे विमानतळ म्हणजे दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळच आहे,” असा ठाम दावा करत शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सरकार आणि केंद्रावर थेट हल्ला चढवला आहे.

बाळाराम पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे सुपुत्र, लोकनेते दि. बा. पाटील यांचा उल्लेख केला, हे स्वागतार्ह आहे. पण मला अपेक्षा होती की ते या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करतील. मात्र ही अपेक्षा पूर्ण न झाल्याने मनात तीव्र नाराजी आहे.” त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “हेच मी गेल्या तीन दिवसांपासून सांगत होतो. आम्ही आंदोलनासाठी तयार होतो. आज पंतप्रधानांना दि. बा. पाटील यांचे नाव घ्यावे लागले, ते केवळ स्थानिकांच्या दबावामुळेच.”

त्यांनी पुढे म्हटले की, “या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळविण्यासाठी संघर्षाशिवाय गत्यंतर नाही. आम्ही मागे हटणार नाही. जर सरकारने दुर्लक्ष केले तर जनतेचा संताप उफाळून येईल.”

पनवेल परिसरात आधीच नागरिक आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष वाढला असून, बाळाराम पाटील यांच्या वक्तव्याने त्याला आणखी धार आली आहे. उद्घाटनाच्या दिवशीच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामकरणावर मौन बाळगल्याने नाराजी उसळली होती.

आता शेकाप आणि स्थानिक संघटनांनी पुन्हा एकदा लढा उभारण्याची तयारी दाखवली आहे. “दि. बा. पाटील यांचे नाव नसेल तर विमानतळाचे उद्घाटन अपूर्णच राहील,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न आता अधिक तीव्र संघर्षाच्या मार्गावर गेला आहे.