नवी मुंबई: एक गुन्हा पचवला गेला कि पुन्हा दुसरा केला जातो, आणि ती व्यक्ती निर्ढावत अट्टल गुन्हेगार बनते. मात्र अनेकदा एकाच प्रकारचा गुन्हा पुन्हा पहिल्याच ठिकाणी करावयास गेले कि पकडला जातो. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईतील ऐरोली येथे समोर आला आहे. बनावट सोने गहाण ठेवत लाखभर रुपये घेतले तो गुन्हा पचला म्हणून पुन्हा त्याच ठिकाणी बनावट सोन साखळी गहाण ठेवण्यास गेले आणि संबंधित वित्त पुरवठा संस्थेने चोरी पकडली.

तीन जणांनी संगमात करून सोने गहाण ठेवून पैसे देणाऱ्या वित्त कंपनीला फसवून खोटी सोन्याची साखळी देत त्यांच्या कडून पैसे घेतले. मात्र काही दिवसांनी त्यातील एका महिलेने पुन्हा तोच प्रयत्न करताना पकडली गेली. त्या तिन्ही संशयित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण नेमाडे, संतोष ओझा आणि सांची झा असे त्या संशयित आरोपींची नावे आहेत. ऐरोली येथे सोने गहाण ठेवून अर्थपुरवठा करणारी मुथूट पिनकॉर्प नावाचे कंपनी आहे. याच ठिकाणी २९ जुलै रोजी लक्ष्मण नेमाडे, संतोष ओझा आणि सांची झा या तिघांनी एक सोन्याची साखळी गहाण ठेवली होती. त्या बदल्यात त्यांनी १ लाख २७ हजार रुपये घेतले होते. या सोन्याच्या साखळीचे वजन १९. ३ ग्रॅम भरले होते.

एकदा बनवा बनावी यशस्वी झाल्याने पुन्हा करण्याचा प्रयत्न केला आणि फसले….

संशयित आरोपी पैकी सांची झा हि महिला पुन्हा ७ (गुरुवारी) तारखेला याच ठिकाणी आली. तिने दोन सोन्याच्या साखळ्या गहाण ठेवण्यासाठी दिल्या. मात्र सोने पारख केले असता या दोन्ही सोनसाखळ्या सोन्याचे नसून खोट्या असल्याचे निदर्शनास आल्या. तसेच यापूर्वी २९ जुलैला जी सोनसाखळी गहाण ठेवली होती तिची तपासणी पुन्हा केली असता ती सुद्धा खोट्या सोन्याची असल्याचे समोर आले.

या प्रकरणी लक्ष्मण नेमाडे, संतोष ओझा आणि सांची झा यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी लक्ष्मण नेमाडे, संतोष ओझा आणि सांची झा यांच्या विरोधात फसवणूक करणे आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींना अद्याप अटक करण्यात आले नाही.