नवी मुंबई : मंगळवार नवी मुंबईसाठी आगवार ठरला आहे. वाशीतील रहेजा संकुलात लागलेल्या आगीत चौघांचा तर कामोठेत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली. त्याच रात्री तुर्भे आणि सानपाडा येथेही आगीच्या घटना घडल्या आहेत. नवी मुंबईत मंगळवारी एका दिवसात तीन मोठ्या तर एक किरकोळ आगीची घटना घडली आहे.
वाशीत सेक्टर १४ येथील एमजी कॉम्प्लेक्स मध्ये असणाऱ्या रहेजा या उतुंग इमारतीत शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील नवरा बायको आणि त्यांच्या सहा वर्षीय चिमुरडीचा गुदमरून मृत्यू झाला तर आजारी असणाऱ्या एका ८४ वर्षीय जेष्ठ नागरिक महिलेचा भाजून मृत्यू झाला. त्याच रात्री कामोठे येथे एका इमारतीत लागलेल्या आगीत सिलेंडर स्फोट झाला यात आई आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला.त्याच रात्री दहाच्या सुमारास तुर्भे गावातील भूखंड क्रमांक ४५१ येथील जय व्हीला नावाच्या इमारतीच्या गच्चीवर आग लागली.
या ठिकाणी डेकोरेशनचे सामान मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. आगीत हे लाखो रुपयांचे सामान आगीच्या भक्षस्थानी पडले.आग एवढी मोठी होती कि आगीचे लोळ इतरत्र जाऊन अन्य इमारतीत आग लागण्याची भीती होती. त्याची काळजी घेत अग्निशमन दलाने आग विजवली. यासाठी सुमारे दोन अडीच तास लागले तर पहाटे पर्यंत कुलिंगचे काम सुरु होते. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. अशी माहिती वाशी अग्निशमन दलाने दिली. रात्री रॉकेट सारखा फटका येथे येऊन पडल्याने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच सानपाडा सेक्टर चार येथील एका घरात रात्री अकराच्या सुमारास आग लागली होती. तसा कॉल आल्याने अग्निशमन दल रवाना होत असताना आग विझवण्यात आली असल्याची माहिती संबंधित व्यक्तीने कळवल्याने अग्निशमन दल गेले नाही. हि आग किरकोळ स्वरूपाची होती. अशी माहिती वाशी अग्निशमन दलाने दिली.