Navi Mumbai International Airport 10 Key Facts : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्या (बुधवार, ८ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही केंद्रीय मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नवी मुंबईतील नागरिक व भाजपासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असं सांगितलं जात आहे. उद्घाटनाच्या ठिकाणी भव्य मंडपात २५ हजार लोकांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासह राज्यातील विविध प्रांतांतील लोककला, नृत्य, संगीत व पारंपरिक वाद्यवृंद सादर होणार आहेत.

हे विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईसह पुणेकरांची सोय होणार आहे. या विमानतळामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होईल. तसेच ईशान्य मुंबईतील आणि पुण्यातील प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी हे विमानतळ अधिक जवळ असेल.

दरम्यान, उद्घाटनापूर्वी जाणून घेऊया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची १० वैशिष्ट्ये

१. पहिलं उड्डाण डिसेंबरमध्ये

Navi Mumbai International Airport 2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (PC : TIEPL)

या विमानतळाचं उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी होणार असलं तरी येथून व्यावसायिक उड्डाणं डिसेंबरमध्ये सुरू होतील. कोणत्या कंपनीला विमान उड्डाणाचा पहिला मान मिळणार हे अद्याप निश्चित नाही. एअर इंडिया, इंडिगो व अकासा एअर या कंपन्या सध्या स्पर्धेत आहेत.

२. विमानतळाला चार प्रवेशद्वारे, तीन व्यवस्थापन केंद्र

Navi Mumbai International Airport 1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (PC : TIEPL)

या विमानतळाला चार प्रवेशद्वारं असून अल्फा, ब्राव्हो व चार्ली अशी तीन सेंटर्स (व्यवस्थापन केंद्र) असतील, जिथून सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं व्यवस्थापन केलं जाईल. विमानतळावर एकूण ८८ चेक-इन काउंटर्स असतील, त्यापैकी ६६ पारंपरिक काउंटर व २२ सेल्फ चेक-इन काउंटर असतील.

३. सुरुवातीला केवळ सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत उड्डाणे

Navi Mumbai International Airport 2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (PC : TIEPL)

सुरुवातीच्या काळात या विमानतळावरून सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विमानांची उड्डाणं असतील. या विमानतळाची क्षमता ४० एटीएम (Air Traffic Movements) असून सुरुवातीला १० एटीएम चालू असतील. म्हणजेच प्रतितास १० विमानं उड्डाणं किंवा लँडिंग करू शकतील.

४. ४ टर्मिनल्स आणि २ समांतर धावपट्ट्या

Navi Mumbai International Airport 2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (PC : TIEPL)

या विमानतळावर ४ टर्मिनल्स आणि २ समांतर धावपट्ट्या (प्रत्येकी ३,७०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद) असतील. सध्या केवळ एक टर्मिनल व एक धावपट्टी सुरू असेल. दुसऱ्या टर्मिनलची डिझाइन प्रक्रिया चालू आहे. अदाणी समुहाने पहिल्या टप्प्यात २० हजार कोटी रुपये गुंतवले असून दुसऱ्या टप्प्यासाठी ३० हजार कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत.

५. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र म्हणून उभारणी

Navi Mumbai International Airport 2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (PC : TIEPL)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी हे दुबई किंवा हीथ्रो विमानतळासारख्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्राप्रमाणे (International Aviation Hub) करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या विमानतळाची प्रवासी क्षमता वार्षिक दोन कोटी इतकी असून जी पुढील काळात ९ कोटींपर्यंत वाढवली जाणार आहे.

६. शांघायसारखं मालवाहतूक केंद्र

Navi Mumbai International Airport 2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (PC : TIEPL)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रकलांतर्गत भारतातील सर्वात मोठं एमआरओ केंद्र (Maintenance, Repair, Overhaul) उभारलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ लाख मेट्रिक टन वार्षिक मालवाहतूक क्षमतेसह हे केंद्र कार्यान्वित केलं जाईल. अंतिम टप्पा सुरू होईल तेव्हा येथून वार्षिक ३२ लाख मेट्रिक टन मालवाहतूक होईल.

७. अत्याधुनिक लॅन्डिंग सिस्टिम

Navi Mumbai International Airport 2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (PC : TIEPL)

या विमानतळावर Category II Instrument Landing System बसवण्यात आली आहे, ज्यामुळे केवळ ३०० मीटरपर्यंतची दृश्यमानता असली तरी सुरक्षित लॅन्डिंग होऊ शकतं. दाट धुकं अथवा पावसाळ्यात ही सिस्टिम उपयोगी पडेल. मुंबई विमानतळावर लॅन्डिंगसाठी ५५० मीटरपर्यंतची दृश्यमानता लागते.

८. ६४ टक्के GenZ व मिलेनियल्स प्रवासी

Navi Mumbai International Airport 2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (PC : TIEPL)

विमानतळ प्रशासनाने सांगितलं की सध्या भारतात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी ६४ टक्के प्रवासी हे GenZ व मिलेनियल्स पिढीतले आहेत. ही पिढी ‘डिजीयात्रा’चा पर्याय निवडून बोर्डिंगदरम्यानचा वेळ वाचवते, रांगेत उभं राहणं टाळते. त्यामुळे आम्ही अत्याधुनिक व सुरक्षित अशी डिजीयात्रा सुविधा कार्यान्वित केली आहे. ज्यामुळे इमिग्रेनशनच्या रांगांपासून प्रवाशांची सुटका होईल. गेटबाहेर कमी रांगा दिसतील.

९. फूड कोर्टऐवजी फूड हॉलची संकल्पना

Navi Mumbai International Airport 2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (PC : TIEPL)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फूड कोर्टऐवजी फूड हॉल ही संकल्पना आहे. प्रवाशांना वेगवेगळ्या काउंटरवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याऐवजी ते एकाच वेळी अनेक आउटलेटवरून प्री-ऑर्डर करू शकतात आणि त्यांना एकत्रितपणे त्याची डिलिव्हरी मिळेल. Wagamama, Coco Café, Bombay Bond, KFC, Bombay Brasserie, Bayroute, Foo सारखे फूड आउटलेट्स येथे उपलब्ध असतील. मॉलमधील फूड एरिया प्रमाणे या विमानतळावर फूड हॉल असेल. म्हणजे मध्ये बसण्याची व्यवस्था आणि चारही बाजूला फूड आउटलेट्स. तसेच विमानतळाच्या अ‍ॅपद्वारे बोर्डिंग गेटवर ऑनलाइन फूड ऑर्डर करता येईल.

१०.विमानतळावर स्वागतासाठी डिजिटल कलाकृती

Navi Mumbai International Airport 2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (PC : TIEPL)

विमानतळावर ठिकठिकाणी भव्य आणि आकर्षक डिजिटल कलाकृती पाहायला मिळतील. डिपार्चर (निर्गमन) गेटवर सात गोलाकार एलईडी स्क्रीन्स बसवण्यात आल्या आहेत. तसेच आत आणखी दोन डिस्प्ले असतील.