पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा काही तासांवर आला असताना ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा भव्य प्रकल्प उभा राहिला आहे, त्यांनाच उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे. देशाचे पंतप्रधान बुधवारी विमानतळाचे उद्घाटन करणार असताना विमानतळ कंपनीचे भागधारक असलेल्या प्रकल्पग्रस्तांनाच कार्यक्रमात अधिकृत स्थान न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
११६० हेक्टर जमिनीवर उभारलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा बुधवारी पार पडणार आहे. मात्र या विमानतळासाठी आपली शेती, घर, आणि गाव गमावलेल्या १० गावांतील २,७८६ प्रकल्पग्रस्तांना आजतागायत उद्घाटन समारंभाचे निमंत्रण मिळालेले नाही. हे शेतकरीच या प्रकल्पाचे खरे भागधारक असून, त्यांच्या शेअर्सचे वितरण अद्याप बाकी आहे, अशी खंतही व्यक्त होत आहे.
सिडकोने २००७ ते २०१४ दरम्यान शेतकऱ्यांसोबत नुकसानभरपाईच्या पॅकेजचा करार केला होता. या करारानुसार प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या संपादित जमिनीच्या बदल्यात १२.५ टक्के विकसित भूखंड आणि अतिरिक्त १० टक्के जमीन म्हणजे एकूण २२.५ टक्के विकसित जमीन देण्यात आली. तसेच प्रत्येकी १० रुपये किमतीचे १०० समभाग, पुनर्वसन क्षेत्रात घर बांधण्यासाठी १५०० रुपये प्रति चौरस फूट दराने बांधकाम खर्च, स्थलांतरासाठी ५० हजार रुपये वाहतूक भत्ता आणि जीवनावश्यक गरजांसाठी ३६ हजार रुपयांचा भत्ता देण्यात आला. धार्मिक भावना जपण्यासाठी प्रत्येक गावातील मंदिरांसाठी एक कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली.
या ‘सर्वोत्तम’ पॅकेजचा भाग असलेल्या प्रकल्पग्रस्तांना सिडको किंवा विमानतळ ऑपरेटर अदानी कंपनीकडून कोणतेही अधिकृत निमंत्रण देण्यात आलेले नाही. कोणत्याही गावातील माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य किंवा स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रण पाठवले गेलेले नाही. राजकीय पक्षातील काही मोजक्या कार्यकर्त्यांनाच कार्यक्रमात प्रवेश देण्यात आल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.
चार दिवसांपूर्वी बेलापूर येथील पत्रकार परिषदेत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प साकारला असल्याचे सांगितले होते. मात्र त्या शेतकऱ्यांनाच उद्घाटनापासून दूर ठेवण्यात आल्याने नाराजी वाढली आहे.
प्रकल्पग्रस्तांनी रोजगारासाठी पाठपुरावा केल्यावर सिडकोचे अधिकारी विमानतळाचे संचलन करणाऱ्या अदानी उद्योग समूहाकडे बोट दाखवतात. अदानी उद्योग समुहाच्या समन्वयात प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठक घेऊनही फारसे काही साध्य झालेले नाही. प्रत्यक्ष नुकसान भरपाईचा करार प्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात झाला. मात्र आतापर्यंत रोजगाराबाबत एकही संयुक्त बैठक सिडको, अदानी उद्योग समुह आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात झालेली नाही, अशी तक्रार प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे.
विमानतळात स्वच्छता विभागात दीडशेहून अधिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळाले तरी, बहुसंख्य शेतकरी अजूनही स्थिरतेच्या प्रतीक्षेत आहेत. विकासाची भरारी घेत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला, त्यांच्या सामाजिक स्थितीतही समाधान असावे, हीच खरी अपेक्षा, असे प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी ॲड. विक्रांत घरत यांनी सांगितले. अशीच खंत लोकनेते दि. बा. पाटील २७ गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी सुद्धा व्यक्त केली. नंदराज यांच्या गावची जमीन विमानतळ प्रकल्पात संपादीत झाली असून त्यांनाही कोणत्याही प्रकारचे निमंत्रण पत्रिका मिळाली नसल्याचे अध्यक्ष मुंगाजी यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पनवेल, उरण सह नवी मुंबईतील हजारो नागरिक उत्सुक आहेत. विमानतळ प्रकल्प येथील प्रकल्पग्रस्तांच्या त्यागामुळे पूर्ण होत असताना अशा प्रकल्पग्रस्तांना या सोहळ्याला बोलावले जावे त्यासाठी पासची सोय करावी अशी सूचना मी सिडकोच्या उच्चपदस्थांना केली आहे.-प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप
सिडको नक्कीच विमानतळ प्रकल्पात ज्यांच्या जमिनींचे संपादन झाले अशा प्रकल्पग्रस्तांचा मान राखणार असून त्या प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव पासची सोय केली आहे. लवकरच पासचे वितरण करण्यात येईल.-रामदास जगताप, सिडकोचे भूमी व पुनर्वसन विभाग अधिकारी