नवी मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस तिकिटांची विक्री होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला दररोज सकाळच्या पहिल्या तासांत ८ ते १० विमानांचे उड्डाण त्यानंतर मागणीनुसार २० ते ३० विमानांचे दर तासाला उड्डाण करण्याचे नियोजन केल्याची माहिती सिडको आणि अदानी समूहातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर उड्डाणांसाठी सज्ज झाला आहे. ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे औपचारिक उद्घाटन होणार असून, त्यानंतर डिसेंबरमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना मिळाल्यामुळे तिकीट विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्ण क्षमतेने उड्डाणांसाठी इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रमुख विमान कंपन्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवले असून, ‘इंडिगो’ने पहिल्या उड्डाणासाठी आपली तयारी दर्शवली आहे.
विमानतळावर विविध मार्गांनी प्रवेश
विमानतळाकडे जाण्यासाठी अटल सेतू, ठाणे उन्नत मार्ग आणि मेट्रो-८ चे काम अद्याप पूर्ण झाले नसले तरी, तात्पुरत्या स्वरूपात बेलापूर-उलवे मार्गिकेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) ५० वातानुकूलित विजेवरील बस विमानतळासाठी सुरू करण्यात येणार आहेत. वाशी, ठाणे आणि मुंबईशी थेट बस सेवेच्या माध्यमातून जोडणी केली जाणार आहे.
‘एनएमआय’ जागतिक सांकेतिक कोड
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने नवी मुंबईतील या विमानतळाला ‘एनएमआय’ हा जागतिक सांकेतिक कोड दिला असून, आता हवाई वाहतूक व्यवहारात नवी मुंबई विमानतळाची ओळख ‘एनएमआय’ या नावाने केली जाणार आहे. यानुसार तिकीट विक्री करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या प्रणालींमध्ये आधीच हे नाव अद्ययावत केले आहे.
कार्गो वाहतुकीस नवे द्वार
नवी मुंबई विमानतळ येथून सुरुवातीला ५ लाख मेट्रिक टन कार्गो वाहतूक, तर पुढील काही वर्षांत ३२ लाख मेट्रिक टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट आहे. यासाठी पूर्वेकडील कार्गो टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून, यामुळे महाराष्ट्रातील उद्योग, निर्यातदार आणि व्यापार क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
विमातळावर पोहोचण्यासाठी मुख्य मार्ग
ठाणे : नवी मुंबई विमानतळ पनवेलजवळील उलवे भागात असल्याने ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि उपनगरमधील रहिवाशांना हे विमानतळ गाठण्यासाठी काही महत्त्वाचे रस्ते मार्ग उपलब्ध आहेत. ठाण्याहून नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरून मुलुंड, एरोलीमार्गे अथवा ठाणे-कळवा-विटावा, दिघा, नेरूळ तेथून पुढे बेलापूर-उलवे रस्त्याने विमानतळ गाठता येऊ शकते. हे अंतर अंदाजे ३५ ते ४० किमी इतके आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाने जेव्हीएलआर, पूर्व द्रुतगती मार्ग, वाशी खाडी पूलमार्गे पुढे उलवेला पोहोचून विमानतळ गाठता येईल. हे अंतर अंदाजे ४० ते ४५ किमी आहे. वरळी येथून अटल सेतू, उलवे बेलापूरमार्गे विमानतळ गाठता येईल.