नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघरमध्ये एका परप्रांतीय व्यक्तीने मराठी भाषेबाबत दाखवलेल्या मुजोरपणामुळे वाद चिघळला असून, स्थानिक नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर संबंधित तरुणाला जाहीर माफी मागावी लागली आहे. ‘मराठी बोलना जरूरी है क्या सबको?’ असा सवाल विचारणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
खारघरमध्ये सूरज यादव नावाचा एक तरुण पिठाची गिरणी चालवतो. गेल्या अनेक महिन्यांपासून या दुकानावर फक्त हिंदीत पाटी लावलेली होती. ज्यात गिरणीत मिळणाऱ्या सर्व वस्तूंची नावेही हिंदीत लिहिण्यात आली होती. खारघरच्या या भागात मराठी भाषिकांची संख्या जास्त असून स्थानिक नागरिकांनी त्याला मराठी पाटी लावण्याची वारंवार विनंती केली. मात्र, यादवने याकडे वारंवार दुर्लक्ष केलं आणि उलट उर्मटपणे प्रतिक्रिया देत, “मराठी बोलना जरूरी है क्या सबको?” असं विचारत मराठी भाषेचा अवमान केला.
या सर्व प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. याबाबत स्थानिकांनी मनसेच्या शाखेत कळवल्यावर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत यादवला जाहीर माफी मागायला लावली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत हा संपूर्ण प्रकार दाखवण्यात आला आहे, ज्यात संबंधित तरुण स्थानिकांच्या प्रश्नांना सरळ उत्तर न देता उर्मटपणे बोलून टाळाटाळ करताना दिसतो आहे.
व्हिडिओत स्पष्टपणे दिसते आहे की, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिकावीच लागेल. गेल्या सहा महिन्यांपासून तुला सांगतो आहे दुकानाची पाटी मराठीत कर. कधी करणार आहेस?”, असा आग्रह स्थानिकांनी केला. मात्र, या विनंतीला यादवने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, अखेर स्थानिकांकडून आलेले दडपण आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे या तरुणाला माफी मागावी लागली.
सध्या समाजमाध्यमांवर या प्रकरणाविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, ‘मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही’, अशी ठाम भूमिका नागरिकांकडून घेतली जाताना पाहायला मिळते आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा परप्रांतीयांकडून मराठी भाषेप्रती असलेली अनास्था चव्हाट्यावर आली आहे.
कायद्याच्या चौकटीतून – काय आहे ‘मराठी पाटी’बाबतचा नियम?
महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून स्थानिक भाषिक अस्मितेचा मुद्दा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. मराठी भाषेला प्रतिष्ठेचे स्थान देण्यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले असून, २०२२ मध्ये ‘महाराष्ट्र दुकान व आस्थापना (मराठी भाषा फलक) नियम’ अधिसूचित करण्यात आला. या नियमांच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील प्रत्येक व्यावसायिक आस्थापनावर मराठीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
मुख्य नियम काय सांगतो?
- प्रत्येक दुकान, व्यावसायिक आस्थापनावर मराठी भाषेतील पाटी लावणे अनिवार्य आहे. ही मराठी पाटी मुख्य दरवाज्यावर, ग्राहकांच्या सहजदृष्टीस पडेल अशा ठिकाणी लावली पाहिजे.
- मराठी मजकूर सर्वात मोठ्या अक्षरांमध्ये असणे बंधनकारक आहे. म्हणजेच, इंग्रजी, हिंदी अथवा इतर भाषांचा वापर करता येईल, पण मराठीपेक्षा मोठ्या अक्षरांमध्ये दुसरी भाषा लिहू शकत नाही.
- हे नियम केवळ छोटे दुकानदारापुरते मर्यादित नाहीत. यामध्ये मॉल्स, बहुराष्ट्रीय कंपन्या, नामवंत ब्रँड्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ऑफिसेस यांचा समावेश आहे. सरकारी व खाजगी – दोघांनाही हे नियम लागू होतात.
नियमभंग झाल्यास काय शिक्षा?
- नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात स्थानिक प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत:
- संबंधित दुकानाची नोंदणी रद्द केली जाऊ शकते.
- महापालिका, नगरपरिषद किंवा पंचायत समितीमार्फत दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
- गरज भासल्यास, व्यावसायिक परवाना निलंबित/रद्द केला जाऊ शकतो.
अशा कारवाईसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकृत सूचना पाठवून तपासणीचे अधिकार आहेत.
अंमलबजावणीबाबत वास्तव काय सांगते?
या कायद्याची अंमलबजावणी होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अनेक शहरांमध्ये याबाबत ढिसाळपणा दिसून येतो आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक आस्थापनांवर अद्यापही इंग्रजी किंवा देवनागरी लिपीचा गैरफायदा घेत हिंदी फलकच दिसतात. महापालिकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटिसा दिल्या असल्या, तरी कारवाई केवळ प्रतिकात्मकच राहिली आहे. काही व्यापाऱ्यांकडून कायद्याबद्दल अनभिज्ञता, तर काहींकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते.
मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. ‘मराठी पाटी’ हा त्याचा एक अत्यंत छोटा पण महत्त्वाचा भाग आहे. कायद्याच्या नियमांना फक्त कागदापुरते न ठेवता, प्रत्यक्ष व्यवहारात त्याची अंमलबजावणी व्हावी, हीच मराठी नागरिकांची आणि मराठीप्रेमी संघटनांची अपेक्षा आहे.