कुकशेत

नवी मुंबईतील कुकशेत हे पहिले गाव जे रासायनिक प्रदूषणाचा बागुलबुवा तयार करून विस्थापित करण्यात आले. गावाच्या आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात घर करून आहेत. विशेष म्हणजे शेजारच्या एका गावाला प्लेगच्या साथीमध्ये सामावून घेणाऱ्या या गावाला नंतर दुसरीकडे स्थलांतरित व्हावे लागले.

शीव-पनवेल महामार्गावरील हार्डिलिया या पहिल्या रासायनिक कारखान्याच्या मागे असलेले विस्थापित गाव म्हणजेच कुकशेत गाव. हे गाव आता या कारखान्याच्या मागे नाही. बावीस वर्षांपूर्वी ते नेरुळ सेक्टर १४ येथे विस्थाापित करण्यात आले. त्यामुळे या गावाला जुना आणि नवीन असे दोन इतिहास चिकटले आहेत. साडेतीन एकर वरच्या गावातील कौलारू छत, सारवलेल्या भिंतींची जागा आता पुनर्वसन ठिकाणच्या गावाने सिमेंट क्राँक्रीटच्या पक्क्या घरांनी घेतली आहे. नवी मुंबईतील हे पहिले गाव जे रासायनिक प्रदूषणाचा बागुलबुवा तयार करून विस्थापित करण्यात आले. गावाच्या आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात घर करून आहेत. विशेष म्हणजे शेजारच्या एका गावाला प्लेगच्या साथीमध्ये सामावून घेणाऱ्या या गावाला नंतर दुसरीकडे स्थलांतरित व्हावे लागले.

पूर्वे बाजूस गावाचाच एक भाग असलेले आदिवासी पाडे, त्या पल्याड डोंगर आणि शेती. पश्चिम बाजूस ठाणे-बेलापूर व सायन-पनवेल महामार्ग. दक्षिण बाजूस टेकडीवरचे गाव म्हणून ओळखले जाणारे शिरवणे आणि उत्तर बाजूस विस्तीर्ण अशी शेती. अशा या भौगोलिक रचनेत असलेले कुकशेत व बोनसरी ही दोन गावे हे पंचक्रोशीतील अनेक गावांपासून कोसो दूर होती. आज ह्य़ा दोन्ही गावांचे अस्तित्व संपुष्टात आलेले आहे. मुंबईत रासायनिक कारखान्यांना बंदी घालण्यात आल्याने अनेक कारखान्यांनी आपला गाशा नवी मुंबई एमआयडीसीत हलविला. विशेष म्हणजे राज्य शासनाने हे औद्योगिक वसाहत रासायनिक क्षेत्र म्हणूनच प्रथम घोषित केले होते, मात्र नंतर त्याच्यासमोर सिडकोच्या माध्यमातून वसाहत निर्माण केली गेली. या रासायनिक क्षेत्रात १९७२ मध्ये पहिला कारखाना हार्डिलिया सुरू झाला. कुकशेत गावाची सुमारे साठ एकर जमीन या कारखान्यासाठी संपादित करण्यात आली. त्याच गावाला नंतर विस्थापित व्हावे लागले. त्याला कारणही तसेच घडले. १९८५ मध्ये या कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन एक कामगार मृत्युमुखी पडला होता. याच काळात भोपाळ वायू दुर्घटना चर्चेत होती. कारखाना व्यवस्थापनाने हे निमित्त साधून गाव हटविण्याची मागणी एमआयडीसीकडे केली. तेव्हापासून अडीचशे वर्षांपूर्वीचे गाव स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ग्रामस्थांना ही गोष्ट पहिल्यांदा पचनी पडली नाही. त्यासाठी सर्व स्तरांतून ग्रामस्थांवर दबाब टाकणे सुरू झाले. कारखान्याच्या आवारातच शेती आणि पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ग्रामस्थांना कंपनीने केलेला हा विश्वासघात आवडला नाही. ग्रामस्थ आणि शासन अशा चर्चेच्या अनेक फैरी झाल्या. अखेर शासनाच्या माध्यमातून हे स्थलांतर होत नाही असे बघून कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. रासायनिक कारखान्यात दुर्घटना घडल्यास त्याचा त्रास ग्रामस्थांना नाहक सहन करावा लागेल, असे मत कारखाना व्यवस्थापनाने मांडले. ते न्यायालयाला ग्राह्य़ वाटले आणि हे अख्खे गाव नेरुळ सेक्टर चार येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यात ३८ ग्रामस्थांना डावलण्यात आले होते. त्यांच्यासाठी येथील ग्रामस्थांनी निकराचा लढा दिला. जोपर्यंत ३८ जणांना भूखंड मिळणार नाही तोपर्यंत दुसरे ग्रामस्थ नेरुळमध्ये जाणार नाहीत, अशी भूमिका गावाने घेतल्याने आपल्या बांधवांना नवीन ठिकाणच्या जागेत सामावून घेता आले. आज नेरुळ येथील नवीन कुकशेत एक अद्ययावत आणि आकर्षक असे गाव आहे. एमआयडीसीच्या जागेत हे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. सतरा एकरच्या या जागेत ग्रामस्थांनी आता आखीवरेखीव आणि आकर्षक अशी घरे बांधलेली आहेत, मात्र हर्डिलिया मागील गावाची आठवण ग्रामस्थांच्या डोळ्यात आजही पाणी आणणारी आहे. चारही बाजूने निसर्गसंपदा असलेल्या या गावाच्या पूर्वे बाजूस चांगलेच जंगल होते. शेतीवाडी आणि मिठागरावर मजुरीचे काम ही या गावाच्या उपजीविकेची साधने होती. शेतीचा काळ वगळता या गावाच्या चारही बाजूने भाज्यांची लागवड केली जात होती. ह्य़ा भाज्या आजूबाजूच्या गावांना पुरविल्या जात होत्या. म्हात्रे आणि पाटील अशा पंधरा कुटुंबाच्या या गावाचा विस्तार झाल्याने ही संख्या ३०० कुटुंबांपर्यंत गेली. ती आता आठशेच्या वर गेली आहे. शंभर टक्के आगरी असलेल्या या गावाच्या पूर्वे बाजूस कातकरी व आदिवासी लोकवस्ती होती. गावाचा एक भाग असलेल्या या आदिवासी बांधवांना सर्व कार्यात गावकरी सामावून घेत होते. कुकशेत गावाजवळ बोनसरी नावाचे एक दुसरे गाव होते. स्वातंत्र्यपूर्व काळात १९२० दरम्यान आलेल्या एका प्लेगच्या साथीत या बोनसरी गावातील ग्रामस्थांना लागण झाली आणि अनेक ग्रामस्थांना जीव गमवावा लागला. त्यामुळे संपूर्ण गाव सोडून अनेक ग्रामस्थ जवळच्या गावात आश्रयाला गेले. त्यात कुकशेत गावात आश्रयाला जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. गावाच्या दक्षिण बाजूस गावदेवीचे मंदिर होते तर उत्तरेला कालभैरवाचे स्थान असल्याचे मानले जात होते. गावाच्या मधोमध मरीआई देवीचे एक मंदिर होते. विठ्ठल-रुखमाई मंदिराची नंतर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हर्डिलिया कंपनीने गावात अनेक सुविधा दिल्या. त्यात जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धारही आहे. जुन्या गावातील काही मंदिर या नवीन ठिकाणी बांधण्यात आलेली आहेत. चैत्र अखेर आणि वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी होणारी गावची जत्रा ही या संपूर्ण बेलापूर पट्टीत चर्चिली जात होती. कुकशेत गावची जत्रा ही या बेलापूर पट्टीतील शेवटची जत्रा असते. त्यामुळे तिचा पाहुणचार घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ आवर्जून हजेरी लावत होते. सर्वात मोठी जत्रा म्हणून या गावच्या जत्रेचा उल्लेख करावा लागले. सानपाडा गावच्या ग्रुप ग्रामपंचायतीचा कुकशेत गाव हा एक भाग होता. त्यामुळे शिक्षणासाठी शिरवणे व सानपाडा या दोन गावांवर ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागत होते. पूर्वीच्या सातवीपर्यंत मजल मारणाऱ्या ग्रामस्थांपैकी नारायण पाटील, शंकर पाटील, शंकर म्हात्रे या ग्रामस्थांचे नाव घ्यावे लागेल. त्यानंतर कुकशेत गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. याच काळात गावाला विद्युत वीज आणि नळ योजना मिळाली. गावात असलेला एक विस्तीर्ण तलाव जो नंतर एमआयडीसीने बुजवला संपूर्ण सात गावांत सर्वात मोठा तलाव होता. न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर गावातील ३८ कुटुंबांनाही भूखंड देण्याचे आश्वासन एमआयडीसीने पाळले हा क्षण गावासाठी सर्वाधिक आनंदाचा मानला गेला आहे. न्यायालयाच्या आदेशाने कंपनीच्या हट्टामुळे गावावर फिरवण्यात आलेला बुलडोझर हा गावाच्या दृष्टीने अत्यंत दु:खद प्रसंग होता. इतर गावांप्रमाणे या गावातही नाटक, भजन, भारुड मंडळे कार्यरत होती. त्यामुळे राजा हरिचंद्रपासून ते वस्त्रहरणपर्यंतची अनेक नाटके गावातील तरुणांनी बसवली होती. गावातील अनेक तरुणांना हर्डिलिया कारखान्यात नोकरी मिळाल्याने गावाचा विकास झाला हे ग्रामस्थ मान्य करतात. गावाचे गावपण जाऊन शहरी गाव तयार झालेल्या नवीन कुकशेत गावात आजही काही परंपरा राखण्याचा प्रयत्न गावकरी करीत असतात, पण तो जिव्हाळा, प्रेम राहिला नाही असेही हे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे आधुनिकीकरण आले पण गावपण लोप पावले अशीच भावना ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसून येते.