नवी मुंबई : उसने दिलेले २५ हजार परत करत नसल्याचा राग अनावर झाल्याने धारधार शस्त्राने वार करत हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला तब्बल १३ वर्षांनी अटक करण्यात यश आले आहे. हि घटना २०१२ मध्ये रबाळे पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. त्यानंतर अथक प्रयन्त करूनही पोलीस आरोपी पर्यंत पोहचू शकले नव्हते. मात्र १३ वर्षांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले.
छोटू उर्फ छटू, उर्फ मर्कट यादव असे यातील आरोपीचे नाव आहे. यादव याने भवनखन यादव यांची हत्या केली होती. १५ सप्टेंबर २०१२ ला दिघा एमआयडीसी येथे एका निर्जन ठिकाणी भवनखन यादव याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. शवविच्छेदन अहवाल नुसार त्याच्या छातीवर चाकू सारख्या धारधार शस्त्राने अनेक वार केल्याने अति रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला होता. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. २५ हजार रुपयांच्या उसनवारी वरून मर्कट यादव आणि मयत भवनखन यादव यांचे वाद असल्याचे समोर आले. त्यामुळे मर्कट याचा शोध सुरु केला मात्र अथक प्रयत्न करूनही तो पोलिसांच्या हाती न लागल्याने तपास तात्पुरता बंद करण्यात आला होता.
मात्र पोलीस आयुक्त मिलिंद भांरबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे,,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, ,पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) सचिन गुंजाळ, यांनी मागील २० वर्षापासुनचे खुनाचे अउघड संवेदनशील गुन्हयांबाबत माहीती एकत्रीत करून उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास नव्याने सुरु करण्यात आला होता. यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त, अजयकुमार लांडगे, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे,पोलीस उपनिरीक्षक संजय रेड्डी,संजय पवार, पोलीस हवालदार अनिल यादव,किरण राउत, पोलीस नाईक अजय कदम, राहुल वाघ, यांचे पथक स्थापन करण्यात आले.
पुन्हा नव्याने तपास सुरु केल्यावर या पथकाने गुन्ह्याची कागदपत्रे प्राप्त करून आरोपीचे नाव, पत्ता व फोटो प्राप्त केले. शासकीय व खाजगी संस्थांकडुन आरोपीबाबत माहिती संकलित करून, मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण व कौशल्यपुर्ण तपास करून आरोपीचा ठावठिकाणा नागपुर शहर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीचा ठावठिकाणा कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने थेट नागपूर गाठले. त्याठिकाणी एका महाविद्यालयाच्या कामगार वसाहतीतून संशयित आरोपीला ताब्यात शुक्रवारी घेतले गेले. चौकशी केल्यावर आरोपीने मयत भवनखन यादव याला २५ हजार उसने दिले होते. ते पैसे भवनखन यादव हा रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होता आणि कालांतराने पैसे देण्यास नकार दिल्याने राग आला. या रागातून हत्या केल्याची कबुली मर्कट यादव याने दिली.