नवी मुंबई: मोठ्या शहरात हेवी डिपॉझिट घेत सदनिका ठराविक कालावधी साठी घेताना काळजी घेणे आवश्यक आहे. नवी मुंबईत एका व्यक्तीने स्वतःची एक सदनिका पाच वेगवेगळ्या जणांना देतो सांगत त्यांच्या कडून ३६ लाख रुपये घेतले मात्र शेवटी एकालाही सदनिका भाड्याने दिली नाही. याबाबत नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात संशयित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

के एस नागराज असे यातील संशयित आरोपीचे नाव आहे. घणसोली येथे राहणारे मच्छिंद्र पवार यांना याच परिसरात हेवी डिपॉझिट वर सदनिका हवी होती. त्यात नागराज हा त्यांच्या संपर्कात आला. नागराज याची एक सदनिका सेक्टर सहा मधील भूखंड क्रमांक ३२ येथील कारगिल सोसायटी इमारत क्रमांक २९ मध्ये आहे. हि सदनिका हेवी डिपॉझिट वर देईल असे आश्वासन पवार यांना त्याने दिले. त्यांनी ११ लाख ५० हजार रुपये दिले मात्र तीन महिने उलटूही सदनिका ताब्यात दिली नाही. तसेच हीच सदनिका अन्य लोकांना हेवी डिपॉझिट घेत दिली असल्याचेही समोर आले.

त्यात विलास सूर्यवंशी कडून ११ लाख, सीमा उतेकर यांच्या कडून ५ लाख , अनिल शेळके याच्या कडून ४ लाख ५० हजार आणि मनोहर पाटील यांच्या कडून चार लाख असे एकूण ३६ लाख रुपये त्याने घेतल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार एप्रिल महिन्यापासून सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात नागराज याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्याची पडताळणी करून गुरुवारी रबाळे पोलिसांनी नागराज याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेवी डिपॉझिट पद्धती कशी असते?

मोठ्या शहरात हेवी डिपॉझिट देत घर भाड्याने घेणाऱ्यांचे प्रमाणात वाढत आहे. एक रकमी मोठी रक्कम देत ठराविक वर्षासाठी घर भाड्याने घ्यायचे आणि करारानुसार ठराविक कालावधी संपल्यावर दिलेले सर्व पैसे सदनिका मालकाकडून परत घेतले जातात. या दरम्यान इमारत मेंटेनन्स, घराला रंग वैगरे देणे, छोटी मोठी दुरुस्ती हे मात्र भाडेकरूने द्यावे लागते. . अशा पद्धतीमुळे ज्यांच्या कडे पैसे आहेत त्यातील अनेक जण अशाच पद्धतीने भाड्याने सदनिका घेतात.