नवी मुंबई : वडाळा–पनवेल हार्बर मार्गावरील लोकल गाडीच्या टपावर चढण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच भोवला आहे. मानखुर्द परिसरात गाडी धावत असताना टपावर चढलेल्या अंकुर पांडे या २५ वर्षीय तरुणाला उच्चदाबाच्या तारेतून वाहणारा जबर विद्युतप्रवाहाचा झटका बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
मानखुर्दहुन गाडी वाशी स्थानकात पोहोचताच प्रवाशांच्या आरडाओरडीनंतर रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा आढावा घेतला. तेव्हा त्यांना अंकुर पांडे नावाचा हा तरुण टपावरून खाली पडून अंग भाजलेल्या अवस्थेत आढळला. रेल्वे पोलिसांकडून त्याला तत्काळ वाशीतील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.रेल्वे पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा तरुण एका इंटेरिअर कंपनीत कामाला असल्याचे समजते आहे. सध्या तरुणाची प्रकृती गंभीर असून, या प्रकरणाचा पुढील तपास वाशी रेल्वे पोलीस करत आहेत.
जुलै महिन्यातही असाच अपघात
हार्बर रेल्वे मार्गावर ओव्हर हेड वायरचा झटका लागून अपघात होण्याचे प्रकार वाढले असून, टपावर चढण्याचा मोह नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो. गेल्या महिन्यातही नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात आपल्या मित्रांसोबत रिल्स बनवण्यासाठी एक मुलगा एका रेल्वे डंप व्हॅनवर चढला होता. यावेळी रिल बनवण्यासाठी हात वर करताच वरील हाय व्होल्टेज विद्युत तारेला हात लागून तो गंभीर जखमी झाला होता. सुमारे ६० टक्के जळालेल्या त्या १६ वर्षीय मुलाचा ६ दिवसांच्या उपचारा दरम्यान अखेर मृत्यू झाला.
अपघातांची चिंताजनक मालिका
मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये दररोज सरासरी सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू होतो. यामध्ये गर्दी, धावत्या गाड्यांवरून पडणे, टपावर चढणे आणि रुळ ओलांडणे ही प्रमुख कारणे आहेत. २०२४ मध्ये एकट्या मुंबईत २,४६८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २,६९७ जण जखमी झाले. गेल्या ११ वर्षांत २९ हजारांहून अधिक प्रवाशांनी जीव गमावला आहे. यापैकी सहा हजारांहून अधिक प्रवासी गाड्यांवरून पडले, तर पंधरा हजार जण रुळ ओलांडताना मृत्यूमुखी पडले. यात कल्याण, ठाणे, वसई या स्थानकांवर सर्वाधिक अपघात नोंदवण्यात आले आहेत.
प्रशासनाचा इशारा
अशा अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वयंचलित दरवाजे, नवीन संरचनेच्या गाड्या, छपरांवरून प्रवास रोखण्यासाठी संरचना आणि अत्याधुनिक देखरेख प्रणाली बसविण्याचे पाऊल रेल्वे प्रशासनाने उचलले आहे. प्रवाशांनी सुरक्षाविषयक नियमांचे पालन करावे आणि टपावर किंवा दारात लटकून प्रवास टाळावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.