विकास महाडिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकसदस्यीय प्रभाग रचनेस राष्ट्रवादी, शिवसेनेचा पाठिंबा; राज्य सरकारकडून लवकरच निर्णय

नवी मुंबई महापालिकेची पुढील वर्षी होऊ घातलेली निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग (पॅनेल) पद्धतीऐवजी २०१५च्याच एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यात येण्याची चिन्हे आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी भाजप सरकारने आणलेल्या पॅनेल पद्धतीच्या निवडणुकीचा नवी मुंबईत महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारकडून ही पद्धत रद्द करण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी एप्रिलच्या दरम्यान होणार आहे. एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत या शहरात एकूण १११ एकसदस्यीय प्रभागांची रचना करण्यात आली. मात्र, यंदा राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने पालिका प्रशासनाने बहुसदस्यीय प्रभाग रचना पूर्ण केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या सध्याच्या १११ प्रभागांसाठी चार प्रभागांचे २७ तर तीन प्रभागांचा एक अशा २८ बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. या निवडणूक पद्धतीबद्दल सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच राजकारण्यांतही उत्सुकता असून पॅनेल पद्धतीचा फायदा कोणाला होईल, याची समीकरणे मांडण्यात येत आहेत. नवी मुंबईत सध्या दोन्ही आमदार भाजपचे असून गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशानंतर या पक्षाची नवी मुंबईतील ताकद वाढली आहे. दुसरीकडे, नाईक यांच्या पक्षांतरानंतर आपल्या अस्तित्वासाठी झुंजत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि पालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी उत्सुक शिवसेना या दोन्ही पक्षांकडून महापालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्याची चाचपणी सुरू आहे. मात्र, पॅनेल पद्धतीने निवडणूक झाल्यास या तिन्ही पक्षांची वेगवेगळी चिन्हे मतदारांत संभ्रम निर्माण करतील व एकाच चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या भाजपला त्याचा अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.

भाजप सरकारने राज्यात बहुसदस्यीय प्रभाग रचना जाहीर केल्याने तळागाळापर्यंत पोहोचलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील अनेक नगरपालिका आणि महापालिका काबीज केल्या आहेत. त्यामुळे बहुसदस्यीय निवडणूक ही भाजपसाठी पूरक ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.  स्थानिक प्रबळ नेते वा कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष वाढविणाऱ्या राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षांचा त्यामुळेच बहुसदस्यीय प्रभाग रचनेला विरोध आहे.  शिवसेनेच्या नेत्यांनीही ठाणे महापालिकेतील निवडणुकीच्या अनुभवातून याची चाचपणी केली असून त्यासंदर्भातील अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आला आहे.   राज्य सरकारकडूनही त्याला अनुकूलता मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

बहुसदस्यीय पद्धत अशी..

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकसदस्यीय पद्धतीमुळे एका प्रभागातील उमेदवार हा सत्तासंपती आणि दहशतीच्या जोरावर सहज निवडून येत असतात. यात अपक्षांची संख्या वाढत असल्याने घोडेबाजाराला ऊत येत असल्याचे दिसून येते.  प्रभागातील मातब्बर नगरसेवकांची मक्तेदारी मोडीत काढून पक्षांचे महत्त्व अबाधित राहावे यासाठी बहुसदस्यीय निवडणूक पद्धत अमलात आणली गेली आहे. या पद्धतीमुळे केवळ एकाच प्रभागात प्रभाव सिद्ध न करता जवळच्या चार प्रभागात त्या सदस्यांला ताकद सिद्ध करावी लागत आहे. एकसदस्यीय प्रभाग रचनेतील एका छोटय़ा प्रभागातील जनसंपर्काखेरीज त्या सदस्याला चार बहुसदस्यीय प्रभागात कर्तृत्व सिद्ध करावे लागत असल्याने ही निवडणूक चुरशीची होत असून एकमेकांवर अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. प्रत्येक प्रभागात निवडून येण्याची ताकद असलेल्या उमेदवार उभे करून सत्ता काबीज करता येत असल्याने महाविकास आघाडीतील पक्षांचा या पद्धतीला विरोध आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai multi member ward structure canceled abn
First published on: 13-12-2019 at 00:48 IST