नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील धारण तलावांची स्वच्छता गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात आलेली नाही. धारण तलावात आलेल्या कांदळवनामुळे गाळ काढण्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्यात सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र आता त्यात गाळ साचलेल्याने पावसाळ्यात पाणी साचते.
कांदळवनातील गाळ काढण्यासाठी महापालिकेला एमसीझेडएमएची परवानगी अद्याप मिळाली नाही. त्यामुळे धारण तलावांमधून पाण्याचा योग्य निचरा व्हावा म्हणून पालिकेतर्फे सीबीडी येथील पंप हाऊससमोरील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : उद्यानात कार्यकर्त्यांचा ‘श्रमपरिहार’! नवी मुंबई पोलीस तसेच महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
नवी मुंबईत शहर हे खाडीकिनारी वसले आहे. त्यामुळे खाडीत येणाऱ्या भरतीचे पाणी शहरात येऊ नये व शहरातील सांडपाण्याचा निचरा खाडीत व्हावा या हेतूने सिडकोने नवी मुंबईतील विविध भागांत धारण तलाव तयार केले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ११ धारण तलाव आणि स्टॉर्म वॉटर पंप हाऊसला लागून असलेले दोन धारण तलाव असे एकूण १३ धारण तलाव आहेत. या तलावांची गेल्या १९ वर्षांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही. आजघडीला या धारण तलावांची दुरवस्था झाली आहे. शहरातील सिडकोकालीन सर्वच धारण तलाव मागील अनेक वर्षे साफ न केल्याने ते गाळाने व खारफुटीने भरले असल्याने धारण तलावांची स्वच्छता रखडली आहे.
हेही वाचा: पनवेल: सरकारी पोस्ट कार्यालयाबाहेर छप्पर टाकण्यासाठी नागरिकांचा पुढाकार
धारण तलावात असलेल्या खारफुटी कांदळवनामुळे त्यातील गाळ काढण्यास अडचणी येत आहेत. न्यायालय आणि एमसीझेडएमएची परवानगी प्रलंबित आहे. त्यामुळे संपूर्ण धारण तलावाची स्वच्छता करण्यात अडचण येत आहे. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून कांदळवनाला धक्का न लावता पंप हाऊससमोरील गाळ काढण्यात येत आहे.
अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका
हेही वाचा: फ्लेमिंगो पक्ष्यांचा मार्गबदल का?
सीबीडीत असलेल्या धारण तलावातील गाळामुळे पावसाळ्यात परिसरात पाणी साचते. या तलावातील गाळ काढण्यासाठी सातत्याने आमचा पाठपुरावा सुरू आहे. यंदा पाणी साचू नये म्हणून पंप हाऊससमोरील गाळ काढण्याचे काम आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा लवकर होईल.
डॉ. जयाजी नाथ, माजी नगरसेवक