लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : शहरातील सर्व मालमत्तांचे लिडार सर्वेक्षण पूर्ण केल्याचा दावा महापालिकेने केला आहे. या सर्वेक्षणामुळे मालमत्ता करक्षेत्रात न आलेल्या मालमत्तांचेही सर्वेक्षण करण्यात आले असून जमा होणाऱ्या मालमत्ता करामध्येही या सर्वेक्षणामुळे वाढ होणार असल्याचा दावा महापालिकेने केला होता. त्यामुळे मालमत्ता कर ८०० कोटींवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

लिडार सर्वेक्षणाचे काम करण्यात आलेल्या संबंधित कंपनीकडून ३ लाख ९ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करून मालमत्ता विभागाकडे देण्यात आले आहे. पालिकेच्या मालमत्ता विभागानेही या सर्वेक्षण करण्यात आलेल्या मालमत्तांची पुनर्पडताळणी काम सुरू केल्याची माहिती पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या प्रमुख व अतिरिक्त आयुक्तांनी दिली. तर दुसरीकडे हे काम पूर्ण करण्यात आल्याचा दावा पालिकेने केल्यामुळे आगामी अर्थसंकल्पात लिडार सर्वेक्षणानुसार मालमत्ता कर वाढणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी वाचा-विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका; भूसंपादनाचे दर अजूनही अनिश्चित

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचा पालिकेच्या इतिहासात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणामुळे शहरातील मालमत्तांची ठोस आकडेवारी प्राप्त होणार आहे. मालमत्ताचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात आले आहे. याबाबत लिडार सर्वेक्षण केलेल्या मे. सेन्सस टेक लि.च्या विजय भारती यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

मालमत्ता कर वसुलीत नक्की वाढ होणार का?

नवी मुंबई महापालिकेने अर्थंसंकल्पात मालमत्ता कर वसुलीचे लक्ष ८०० कोटी ठेवण्यात आले आहे. परंतू आतापर्यंत झालेल्या लिडारच्या कामामुळे प्रत्यक्षात किती कर वाढेल याची ठोस आकडेवारी नाही. त्यामुळे या जवळजवळ २२ कोटी रुपये खर्चाच्या कामाचा नक्कीच पालिकेला फायदा होणार का याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिडार सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेकडून काम पूर्ण करण्यात आले आहे. संबंधित कंपनीने दिलेल्या कामाची पुनर्तपासणी करण्याचे काम सुरू असून वाढलेल्या मालमत्तानुसार नोटीसाही पाठवण्यात आल्या आहेत. -राजेश नार्वेकर, आयुक्त, नमुंमपा