करोनाकाळात नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीत केवळ ५५ कोटी
संतोष जाधव, लोकसत्ता
नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यांपर्यंत ७०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ठेवले. मात्र, प्रत्यक्षात पालिकेकडे ५५९ कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत शहरातील विकासकामांना कात्री लागण्याची चिन्हे आहेत.
पालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांना दंडात्मक रकमेवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या अभय योजनेला मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
एप्रिल ते जून २०१९ या कालावधीत मालमत्ता करापोटी १२५ कोटी रुपयांची वसुली झाली. परंतु यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात करोना संसर्गामुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्याने एप्रिल, मे आणि जून महिन्यांत नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीत केवळ ५५ कोटी रुपये जमा झाले. त्याच वेळी खर्चाचा आकडा वाढत चालला आहे.
यात पालिकेचा कोटय़वधींचा निधी करोना नियंत्रणासाठी खर्च केला जात आहे. त्याच वेळी करोनावर नियंत्रण मिळवण्यास पालिकेने प्राधान्य दिल्याने खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. शासनानेही खर्चाबाबत ३३ टक्क्यांचे नियंत्रण आणले आहे.
शहरात सुमारे तीन लाख १५ हजार मालमत्ता करधारक आहेत. पालिकेने गेल्या फेब्रुवारीपर्यंत ५३९ कोटी रुपयांची वसुली केली होती. यात अभय योजनेअंतर्गत १९१ कोटी रुपयांची वसुली केली. इतर पालिकांच्या तुलनेत ही नवी मुंबई पालिकेने चांगली वसुली केली होती. मार्चअखेर देशात करोना संकटामुळे पालिकेला आर्थिक फटका बसला. करोनाकाळात पालिकेची मालमत्ता कराची वसुली निम्म्याहून कमी आहे.
मार्चपर्यंत पालिकेने केलेल्या मालमत्ता कर वसुलीत प्रत्यक्ष
नियमित मालमत्ता कर वसुली ३४९ कोटी झाली आहे. तर अभय योजनेद्वारे २०५ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. मात्र, गतवर्षी पालिकेची प्रत्यक्ष करवसुली ४९१ कोटी होती. यंदा ती ३४९ कोटीपर्यंत खाली आली आहे.
अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. करापोटीची वसुली वाढवण्याबाबतही उपाययोजना करण्यात येतील.
-अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई महापालिका
वर्षनिहाय करवसुली
२०१६—१७ ६४४ कोटी
२०१७—१८ ५३५ कोटी
२०१८—१९ ४९१ कोटी
२०१९—२० ५६९ कोटी
