नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आपत्ती निवारणासाठी विभागवार यंत्रणा असून यामध्ये पालिकेचे अग्निशमन दल महत्त्वाची भूमिका बजावते. त्या कार्यवाहीत अधिक सक्षमता येण्याच्या दृष्टीने महापालिकेने स्वत:चा आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापन केला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागातील प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी तसेच नागरी संरक्षण दलामधील अधिकारी यांचा समावेश असणारे हे स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद दल यापुढील काळात नवी मुंबईतील आपत्ती निवारणासाठी सज्ज असणार आहे.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) तसेच ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती प्रतिसाद पथक (टीडीआरएफ) या धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेने हा आपत्कालीन प्रतिसाद दल (डीआरएफ) स्थापन केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. आपत्कालीन प्रतिसाद दल नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ तास कार्यरत असणार आहे. आपत्ती किंवा दुर्घटनेचे स्वरुप मोठे असल्यास दलामधील सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रित काम करणार आहेत.

नवी मुंबई शहराच्या भौगोलिक व्याप्तीमध्ये डोंगरावरील वस्ती, खाडी किनारा, तलावे, जुनी बांधकामे, शहरातून जाणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग इत्यादी बाबींचा विचार करता नवी मुंबई शहरामध्ये कोणतीही आपत्ती उद्भवू शकते. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पाणी तुंबणे, वृक्ष पडणे, इमारत ढासळणे, निवासी, व्यापारी मालमत्तांमध्ये पाणी शिरणे, दरड कोसळणे, भूस्खलन अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अशाप्रकारे नवी मुंबई शहरामध्ये कोणतीही नैसर्गिक अथवा मानव निर्मित आपत्ती घडल्यास अग्निशमन दलास पाचारण केले जाते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अग्निशमन विभागातील प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी आणि नागरी संरक्षण दलामधील अधिकारी यांचा समावेश असणारे स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापना करण्यात आलेले आहे.

११ जणांचा प्रशिक्षित समूह

परिमंडळ- १ व परिमंडळ-२ अंतर्गत परिमंडळनिहाय आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापित करण्यात आलेले असून हे दल उपआयुक्त आपत्ती व्यवस्थापन यांचे देखरेख व नियंत्रणाखाली कार्यरत राहणार आहे. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रेमानंद ठाकूर हे परिमंडळ १ आपत्कालीन प्रतिसाद दलाचे तसेच सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी पदाजी निरगुडे हे परिमंडळ २ आपत्कालीन प्रतिसाद दलाचे नियंत्रण अधिकारी असतील. त्यांच्या नियंत्रणाखाली विभागीय क्षेत्ररक्षक, अग्निशमन प्रणेता, अग्निशामक अशी ११ जणांचा प्रशिक्षित समूह मदतकार्यासाठी दक्षतेने आपत्ती निवारणासाठी कार्यरत असणार आहे.

संपर्काचे आवाहन

नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या मदतकार्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी २७५६७०६०/७०६१ या दूरध्वनी क्रमांकांवर अथवा १८००२२२३०९/१८००२२२३१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपत्कालिन प्रतिसाद दलाची निर्मिती केल्यामुळे नवी मुंबईकरांना अधिक वेगवान मदत होणार आहे. कोणतीही आपत्ती आल्यास अधिक वेगाने व क्षमतेने हे प्रशिक्षित दल मदत करणार आहेत. परिमंडळ १, २ साठी प्रत्येकी दोन तुकड्या असून प्रत्येक तुकडीत २ नागरी संरक्षक दलाचे विभागीय क्षेत्ररक्षक असणार आहेत.- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त ,नवी मुंबई महापालिका