नवी मुंबई : नवी मुंबई शहराला जलसमृद्धता बहाल करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण १०० टक्के भरले असून नवी मुंबईकरांची जलचिंता मिटली आहे. मागील सहा दिवस सुरू असलेल्या पावसामुळे मोरबे धरणाचे दोन दरवाजे बुधवारी पहाटे उघडण्यात आले. या दरम्यान धरणाच्या पाण्याच्या विसर्ग धावरी नदीत सोडण्यात आला असून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी सतर्कतेचा इशारा नवी मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

महामुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दिवसेंदिवस अतिशय सुनियोजित असलेल्या शहराचा दर्जा आणखी वाढत जाऊ लागला आहे. नवी मुंबई आणि उरणमधील नाव्हा शेवा परिसराला सुरळीत पाणी पुरवठा करता यावा यासाठी मोरबे धरणाची निर्मिती करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर १९९९ मध्ये हे धरण बांधण्यात आले. माथेरानच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी हे या धरणक्षेत्रातील पाण्याचे मूळ स्रोत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या धरणाची निर्मिती केली गेली. यासाठी खालापूर तालुक्यातील आठ गावे आणि सात पाड्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. यात साधारणपणे २ हजार ८०० जण विस्थापित झाले. त्यानंतर २००२ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हे धरण नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केले. धरणाची उंची ८८ मीटर असून त्याची साठवण क्षमता १९० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यातून नवी मुंबईला दररोज ४२० एमएलडी एवढा पाणी पुरवठा केला जातो.

मागील काही दिवसांपासून नवी मुंबई शहरास इतर ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे सर्व नैसर्गिक स्त्रोत तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्याने मुबलक प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. मंगळवारी बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याचे समोर आले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बारवी धरणातून २८ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर दुपारी २ वाजेपर्यंत हा विसर्ग वाढला. हा विसर्ग १८२ घनमीटर प्रति सेकंद वाढल्याची माहिती बारवी धरण कार्यालयाच्या वतीने देण्यात आली होती. दरम्यान मोरबे १०० टक्के भरले असून आज बुधवार पहाटे तीन वाजल्यापासून मोरबे धरणाचे दोन्ही वक्राकार दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडण्यात आले. यातून ११२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला. या दरम्यान धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे जाहीर आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत स्थानिक नागरिकांना करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिकेचे प्रतिदिन ४५० दश लक्ष लिटर क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने (८८ मीटर) भरलेले असून नवी मुंबईच्या जलसमृद्धतेत वाढ झाली आहे. याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

मागील वर्षी धरणातील पाणीसाठा

मोरबे धरण गेल्यावर्षी २८ ऑगस्ट २०२४ ला १०० टक्के भरले होते. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता.