तत्काळ स्वच्छता मोहीमेत १६ टन कचरा उचलला नागरिकांकडून प्रशंसा
नवी मुंबई – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विविध साहित्य खरेदीचे प्रमाण मोठे असल्याने बाजारपेठा गजबजून गेलेल्या होत्या. त्यामुळे कच-याच्या प्रमाणातही वाढ होत असते. दिवाळीच्या कालावधीत वेगवेगळया प्रकारचे फटाके वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कच-यात लक्षणीय भर पडलेली आढळून येते. त्यामुळे पालिकेने राबवलेल्या रात्रीच्या वेळेतील विशेष मोहिमेत तात्काळ १६ टन कचरा उचलण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शहरातील रस्ते व परिसर नेहमीप्रमाणे स्वच्छ असल्याने पालिकेच्या स्वच्छताकर्मीचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
अनुषंगाने स्वच्छ शहर म्हणून असलेला नवी मुंबईचा नावलौकिक लक्षात घेता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदशनानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दिपावली सणाच्या कालावधीत शहर स्वच्छतेवर अधिक काटेकोर लक्ष देण्यात आले होते .
लक्ष्मीपूजनाच्या सणानंतर त्या रात्री म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात स्वच्छतेची विशेष मोहीम २२ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत राबविण्यात आली.
या विशेष स्वच्छता मोहीमेकरिता प्रत्येक विभागात १०० ते १२५ हून अधिक स्वच्छताकर्मी यांची विशेष नेमणूक करण्यात आली होती. तसेच या स्वच्छता मोहीमेत गोळा करण्यात आलेला कचरा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहतूक करून शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी वाहून नेण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे या संपूर्ण साफसफाई मोहीमेच्या नियोजनबध्द कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यांनी मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्यासह विविध विभागांना भेटी देऊन ठिकठिकाणच्या स्वच्छता कामांची पाहणी केली.
शहरातील आठही विभागातील मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणे, बाजारपेठा, मुख्य चौक अशा गजबजलेल्या ठिकाणी रात्री ११ ते पहाटे ३ या कालावधीत राबविलेल्या या विशेष साफसफाई मोहीमेमध्ये हार, फुले. खादयपदार्थ यांचा ६ टन ओला कचरा तसेच कागद, पुठ्ठे, कापड यांचा १० टन सुका कचरा गोळा करून तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उजाडण्याच्या आत मध्यरात्रीपासून पहाटेच्या कालावधीत ही विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आल्याने सकाळी मॉर्निग वॉक करणा-या नागरिकांनी स्वच्छ रस्ते, चौक पाहून या विशेष स्वच्छता मोहीमेची प्रशंसा केली. महत्वाचे म्हणजे मध्यरात्री व पहाटे ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असली तरी दररोज सकाळी होणारी साफसफाई नियमीतपणे सुरु असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाणी काय त्यांच्या निर्देशानुसार लक्ष्मीपूजनाच्या रात्री राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत १६ टन तात्काळ साफ करण्यात आला आहे. शहरात दिवाळीच्या सणानिमित्त स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. डॉ. अजय गडदे, उपायुक्त घनकचरा व व्यवस्थापन विभाग