नवी मुंबई : नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या विकासकामांना सिडको आणि मध्य रेल्वे प्रशासनातील समन्वयाचा अभाव अडथळा ठरत असल्याची टीका ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. प्रवाशांच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने ही स्थानके अक्षरशः पोरकी झाली आहेत, असा आरोप करत खासदार म्हस्के यांनी सिडको आणि रेल्वे अधिकाऱ्यांना तातडीने संयुक्त बैठक घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नवी मुंबईतील दिघा, ऐरोली, रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, वाशी, जुईनगर, बेलापूर, खारघर, बामनडोंगरी, खारकोपर या रेल्वे स्थानकांवरील अनेक समस्या आजही कायम आहेत. या स्थानकांमध्ये छतांची कमतरता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालयांची अनुपलब्धता, बंद असलेल्या तिकिट खिडक्या, अपूर्ण पादचारी पूल, खराब झालेली लाईट्स व पंखे, अपंग व वृद्ध प्रवाशांसाठी आवश्यक असलेले एस्कलेटर यासारख्या मूलभूत सुविधांची उणीव असून, याचा थेट फटका रोज प्रवास करणाऱ्या हजारो नवी मुंबईकरांना बसतो आहे.
खासदार म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची नुकतीच भेट घेऊन नवी मुंबईसह संपूर्ण मतदारसंघातील स्थानकांच्या समस्यांवर चर्चा केली. विशेषतः सानपाडा-जुईनगर रेल्वे पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प आहे. प्रवासी वारंवार मागणी करत असूनही ते पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दिघा स्थानकात छत, पंखे, दिवे व ध्वनिक्षेपक दुरुस्ती, रेल्वे स्टेशन बाहेर ब्लॉक बसविणे, ऐरोली स्थानकावर आरक्षण खिडकी कार्यान्वित करणे, रबाळे पश्चिमेकडील तिकीट खिडकी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवणे, कोपरखैरणे आणि बामनडोंगरीसारख्या स्थानकांवर एस्कलेटर बसविणे, वाशी–बेलापूर व तुर्भे–ऐरोली स्थानकांवरील परिसराचा सुसज्जिकरण करणे यांसह अनेक मागण्या खासदारांनी मांडल्या.
प्रशासनातील समन्वयाचा अभाव हीच मुख्य समस्या असल्याचे म्हस्के यांनी स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले. “सीडकोने स्थानके उभारली, पण रेल्वेने त्याचा ताबा घेतलेला नाही. परिणामी कोण काय करणार यावरच उत्तर नाही. हे गैरसमज व विसंवाद नवी मुंबईच्या विकासाला आडवे येत आहेत,” असे ते म्हणाले.
महत्वाचे म्हणजे, दिघा–ठाणे दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर अप-डाऊन साठी दुचाकी व रिक्षा वापरकर्त्यांसाठी भुयारी मार्ग प्रस्तावित असून, त्याची कामे तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणीही बैठकीत करण्यात आली. नागरिक रेल्वे ट्रॅक ओलांडण्यास भाग पाडले जात असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
या बैठकीदरम्यान सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. दोन्ही प्राधिकरणांनी येत्या आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन नवी मुंबईतील स्थानकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
“मी निवडून आल्यानंतर या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, अद्याप ठोस बदल दिसत नाही. प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, जर परिस्थिती बदलली नाही, तर लोकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागेल,” असा स्पष्ट इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी दिला आहे.
नवी मुंबईसारख्या नियोजित शहरातही रेल्वे स्थानकांच्या अवस्थेची ही दैना असावी, ही बाब नवी मुंबईकरांसाठी अत्यंत खेदजनक आहे. आता दोन्ही प्रशासनांकडून ठोस कृती होऊन ही उपेक्षा संपेल, अशीच अपेक्षा नवी मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे.