नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत गट – क आणि गट – ड यामधील एकूण ३० संवर्गातील ६६८ पदांकरिता ८४७७४ अर्ज प्राप्त झालेले आहेत. या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन स्पर्धा परीक्षा ही १६ ते १९ जुलै रोजी होणार आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना परीक्षा देणे सोयीचे जावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये २८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार मुबंई शहर व उपनगर जिल्ह्यातून आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यातील आहेत. नवी मुंबई महापालिकेतील पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पालिका प्रशासन उपायुक्त यांनी दिली.
पालिकेने उमेदवारांना त्यांच्या नजीकच्या केंद्रावर परीक्षा देता यावी अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा व्यवस्थित पार पडाव्यात याकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे वर्ग १ श्रेणीचे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर महानगरपालिकेचे दोन ते तीन अधिकारी केंद्र निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
ही परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षा प्रवेश पत्र परीक्षेच्या ७ दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आले असून आत्तापर्यंत साधारणत: ७५ हजार उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केलेले आहे. उर्वरित उमेदवारांना एसएमएस व ई मेल व्दारे प्रवेशपत्रे लवकरात लवकर डाऊनलोड करावीत असे संदेश पाठविण्यात आलेले आहेत.
ऑनलाइन परीक्षेचे संवर्गनिहाय वेळापत्रक नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
जिल्हावार उमेदवार
अमरावती – ७२१४
छत्रपती संभाजी नगर – ११९६४
कोल्हापूर – ४९११
मुंबई – २२०६०
नागपूर – ६५४७
नांदेड- ५६४०
पुणे -२१६८३
रायगड – २०१
सातारा -६२१
ठाणे – २०२५
नाशिक -१९०८
नवी मुंबई महापालिका भरतीसाठी सर्व तयारी करण्यात आली असून अत्यंत पारदर्शकपणे ही भरती होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. – शरद पवार, उपायुक्त प्रशासन विभाग ,नवी मुंबई महापालिका