नवी मुंबई : गेल्याकाही वर्षांपासून खारफुटींवर बेकायदेशीर भराव टाकणे, कचरा टाकणे यामुळे खारफुटी नष्ट करण्याचे प्रकार केले जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पर्यावरणवादी वन शक्ती या स्वयंसेवी संस्थेने स्वयंसेवकांच्या मदतीने नेरुळ येथील सारसोळे खारफुटी जंगलातून तब्बल १ हजार २०० किलो अविघटनशील कचरा बाहेर काढला. या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या बाटल्या, काचा, थर्माकोल, चपला, सजावटीचे साहित्य आणि अविघटनशील शालेय साहित्य इत्यादी कचऱ्याचा समावेश होता. त्यामुळे या खारफुटींनी कचऱ्यापासून मोकळा श्वास घेतला आहे.
नेरुळ येथे सारसोळे खारफुटी जंगल आहे. गेल्याकाही महिन्यांत या खारफुटींना कचऱ्याचा विळखा तयार झाला होता. त्यामुळे वन शक्ती या संस्थेने येथील कचरा जंगलातून बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत रोटरी क्लब ऑफ नेरूळचे सदस्य, नेरुळ येथील एस. आय. इ. एस. महाविद्यालयाचे विद्यार्थी, राज्य कांदळवन विभागाचे अधिकारी तसेच वनशक्ती संस्थेचे स्वयंसेवक अशा एकूण १०० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
जागतिक स्तरावर २६ जुलै हा दिवस “जागतिक खारफुटी दिन” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने खारफुटीच्या संवर्धनासाठी जनजागृती व कृतीशील उपक्रम घेण्याचा उद्देश या मोहिमे मागे होता.
खारफुटीच्या जंगलाचे वैशिष्ट्ये
ठाणे जिल्ह्याला मोठ्याप्रमाणात खारफुटी क्षेत्र लाभले आहे. परंतु भूमाफियांकडून या खारफुटींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. भूमाफियांकडून खारफुटी नष्ट केल्या जात असून त्याठिकाणी घरे, रस्ते बांधल्याचेही प्रकार उघड झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील काही खारफुटी क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. मात्र, त्यानंतरही छुप्या पद्धतीने खारफुटींची तोड सुरूच आहे.
खारफुटीची जंगले म्हणजे मासे, खेकडे आणि इतर जलचर यांचे अधिवास असून ही परिसंस्था पर्यावरण संतुलन राखण्यात मोलाची भूमिका बजावते. मात्र, या जंगलात साचणारा प्लास्टिक व अन्य अविघटनशील कचरा जैवविविधतेस मोठा धोका निर्माण करतो. त्यामुळे अशा स्वच्छता मोहिमांची नितांत गरज आहे. खाडीचा प्रवाह कमी करण्यासही खारफूटी महत्त्वाचे कार्य बजावते. त्यामुळे पूराचा धोका टळतो. खारफुटी मोठ्याप्रमामात कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. वनशक्ती संस्थेच्या वतीने अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येणार असून, स्थानिक नागरिकांनी आणि युवा पिढीने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.