नवी मुंबई : शहरातील साहित्य, संस्कृती, कला जोपासणाऱ्या जुन्या संस्थांना त्यांच्या जागेवरून हुसकावून लावण्याचे महापालिकेचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या संस्थांनीही आता मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पालिकेने जागा रिकामी करण्याच्या पाठवलेल्या नोटिसांविरोधात निषेध व्यक्त करत जुन्या संस्थांना हक्काची व कायमस्वरुपी भाडेतत्वावर जागा मिळवायचीच असा ठराव मंजूर करण्यात आला.

नवी मुंबई शहरात अगदी सिडको काळापासून शहरातील साहित्य, संस्कृती, कला जोपासना करण्याचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना भाडे तत्त्वावर दिलेल्या वाशी सेक्टर ३ येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीभवनातील जागा तात्काळ रिकामी करण्याचे लेखी पत्र देण्यात आल्याने शहरातील साहित्य, कला, संस्कृतीसाठी धडपडणाऱ्या विविध संस्था व साहित्यिक यांच्यामध्ये पालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत चीड निर्माण झाली आहे. शहरात मागील अनेक वर्ष टाऊन लायब्ररी,नूतन महिला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, न्यू बॉम्बे म्युझिक अॅन्ड ड्रामा सर्कल, प्रभाग चॅरिटेबल ट्रस्ट, समता महिला मंडळ, जिजाऊ महिला मंडळ, नवी मुंबई स्पोर्टस क्लब अशा विविध संस्थांचे पदाधिकारी या सभेला उपस्थित होते. सामाजिक कामातून शहरातील साहित्य संस्कृती व कला जोपासण्याचे काम करत असताना पालिकेने जागा रिकामी करण्याचे लेखी आदेश दिले. दुसरीकडे निविदा प्रक्रिया राबवून या संस्थाना कायमचे बाहेर करण्याच्या प्रकाराबाबत महापालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.

नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर ३ येथील महात्मा फुले बहुद्देशीय इमारतीतून या संस्थांना बाहेर काढण्याचा प्रकार सुरू असल्याची खंतही वार्षिक सर्वसाधारण बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात पालिकेला याबाबत सकारात्मक विचार करावाच लागेल अशी विश्वासही व्यक्त करण्यात आला.

नवी मुंबई स्वयंसेवी संस्था ह्या समाजाच्या विविध घटकांसाठी योगदान देत असताना त्यांना पालिकेने सातत्याने पाठबळ व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सामाजिक संस्थाना पालिकेने सामाजिक कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. – शुभांगी तिर्लोटकर, आम्ही उद्योगिनी समूह, नवी मुंबई

संस्थाना प्रामाणिक व निःस्वार्थीपणे काम करणाऱ्यासाठी नवी उमेद देण्याची गरज असताना जागा खाली करण्याच्या नोटीस पाठवतात. त्यामुळे नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या वार्षिक सभेत पालिकेने केलेल्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जुन्या संस्थांसाठी हक्काची जागा मिळवायचीच, असा ठराव मंजूर करण्यात आला. – अमरजा चव्हाण, सचिव, नवी मुंबई स्वयंसेवी संघटना