पनवेल – महिन्याभरात नवी मुंबई पोलीस दलातील विविध पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये काम करणा-या पाच कर्मचा-यांचा विविध आरोग्याच्या कारणांमुळे मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी हादरून गेले आहेत. नेमके पोलीस दलात काय सुरू आहे याचीच चर्चा कर्मचा-यांना सतावत आहे. पोलीस कर्मचा-यांच्या आरोग्याचा प्रश्न एेरणीवर आला असून पोलीस कर्मचा-यांची आरोग्य तपासणी वेळेवर केली जाते का असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्यांमध्ये काही पोलीस तरूण होते.
१३ जुलै रोजी नवी मुंबई पोलीस दलाच्या सूरक्षा शाखेत कर्तव्य बजावणा-या ४८ वर्षीय महिला पोलीस हवालदार आश्विनी चिपळूणकर या त्यांच्या कळंबोली येथील घऱात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेल्यावर त्यांचा मृत्यू झाला. २४ जुलै रोजी महापे वाहतूक विभागात काम करणारे ४३ वर्षीय पोलीस हवालदार गणेश पाटील यांना क्रेनने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. २ ऑगस्टला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ५६ वर्षीय दीपक शिरसाठ यांचा देखील रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. तसेच ६ ऑगस्टला मोरा सागरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर नेमणूकीस असलेले ३८ वर्षीय प्रविण बोदाडे यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. ७ ऑगस्टला उरण पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सागर पोळ हे आजारपणासाठी वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या गावी मिरज येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार स्विकारल्यावर पोलिसांच्या आरोग्यावर होणारा कामाचा ताण कमी करण्यासाठी एका अधिका-यांकडे एका प्रकरणाचा तपास ही कामाची पद्धत सुरू केली. जास्तीत जास्त गुन्ह्यांमध्ये तपास योग्यपद्धतीने होण्यासाठी नेल्सन पद्धतीचा अवलंब नवी मुंबई पोलीस दलात सुरू झाला. भौतिक पुरावे आधुनिक तंत्राच्या साह्याने एकत्र करुन त्याचे व्यवस्थित जतन करणे यालाही आयुक्तांनी प्राधान्य दिले. एका पोलीस अधिका-याकडे एकच प्रकरणाचा तपासामुळे कामाचा ताण कमी झाल्याचा दावा आयुक्तांनी केला.
शक्य होईल तेवढ्या महिला व पुरुष कर्मचा-यांना १२ तासांपेक्षा कमीची म्हणजेच ८ ते १० तास ड्युटीचे नेमूण दिले. पोलिसांच्या कुटूंबातील बेरोजगारांना नवी मुंबईतील कंपन्यांमध्ये रोजगारासाठी प्राधान्य मिळावे यासाठी स्वता पोलीस आयुक्तांनी प्रयत्न केले. मात्र महिन्याभरातील या पाचही पोलीसांच्या मृत्यूच्या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलात सर्वच काही पोलीस दलात आलबेल आहे असे चित्र नक्कीच नाही. पोलीसांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबत त्यांचे कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी अधिकचे प्रयत्न नजीकच्या काळात दलप्रमुखांना करावे लागणार आहेत.