नवी मुंबई : नेरूळ येथील डी. वाय. पाटील क्रीकेट स्टेडीयममध्ये  रविवारी (ता.२) होणाऱ्या महिला क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक अबाधित ठेवत नवी मुंबई पोलिसांनी व्यापक वाहतूक नियोजन केले आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.

रविवारी सामन्यादिवशी सकाळी दहा वाजल्यापासून स्टेडीयम परिसरात कडक बंदोबस्त लागू होणार आहे. गर्दीतून वाहने मार्गक्रमण करताना कोंडी निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांना पर्यायी मार्ग शोधण्याची गरज भासू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज राहणार आहे. स्टेडीयमच्या मुख्य रस्त्यांवर आणि आजूबाजूच्या परिसरात १४४ पोलीस शिपाई, ६० वार्डन, १० पोलीस उपनिरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात राहतील.आपत्कालीन परिस्थितीसाठी एक हायड्रा, तर चुकीच्या पार्किंगसाठी चार मोटार आणि दोन दुचाकी टोईंग व्हॅन तैनात असतील.

गर्दी व्यवस्थापनासोबतच स्टेडीयम परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यावर यंत्रणेचा भर राहणार आहे.प्रेक्षकांसाठी स्टेडीयम शेजारील परिसरात पाच ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही वाहनतळाची क्षमता मर्यादित असल्याने प्रेक्षकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. अनधिकृत ठिकाणी पार्किंग केल्यास संबंधित वाहनांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.“मर्यादित पार्किंग असल्याने प्रेक्षकांनी सार्वजनिक वाहतूक वापरावी. सेवा रस्त्यावर बेशिस्त वाहन उभी केल्यास कारवाई होईल,” असा इशारा पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे यांनी दिला आहे.महिला क्रिकेट सामन्याचा आनंद घेताना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

वाहनतळ कुठे उपलब्ध

नेरूळ येथील वंडरपार्क, तांडेल ग्राऊंड, भिमाशंकर ग्राऊंड, एन.एम.एम.सी. स्टेक पार्कींग, आचार्य श्री तुलसी उद्यान, यशवंतराव चव्हाण ग्राऊंड पार्कींग, रामलिला ग्राऊंड तसेच बेलापूर येथील सूनील गावसकर ग्राऊंड