नवी मुंबई – नवी मुंबई शहरात व परिसरात मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत असून जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याची घटना घडली आहे. शहरात बेलापूर व नेरूळ विभागात सर्वाधिक पाऊस झाला असून त्यामुळे रेल्वे स्टेशन तसेच रस्त्यावरही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नेरूळ जुईनगर बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे चांगली चाल झाले असून विविध शाळांच्या परिसरातही वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. नवी मुंबईतील बेलापूर विभागात २४ तासात तब्बल १५९ मिलिमीटर तर बेलापूर परिसरात १३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

शहरातील सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले असून पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागत असल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. सकाळी रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाणीच असल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पाण्यातून मार्गक्रमण करावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. जोरदार पावसामुळे शाळांच्या परिसरात सकाळच्या वेळी वाहनांची कोंडी झाल्याचे चित्र होते.

नवी मुंबई शहरातील नेरूळ रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे स्थानकातून बाहेर पडताना पाण्यातूनच मार्ग काढत मुख्य रस्त्यावर यावे लागले. रेल्वे गाड्याही दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. – सोहम माने, महाविद्यालयीन विद्यार्थी

मागील २४ तासात झालेला नवी मुंबई शहरातील पाऊस

बेलापूर – १५९ मिमी

नेरूळ – १३८ मिमी

वाशी – ९७ मिमी

कोपरखैरणे – ८० मिमी

ऐरोली – ७४ मिमी

दिघा – ५४ मिमी

नवी मुंबई परिसरातील मागील २४ तासातील शहरातील सरासरी पाऊस १००.८० मिमी

नवी मुंबई शहरात झालेला आतापर्यंत पावसाळ्यातील एकूण पाऊस – २९१७.८९ मिमी