उरण : राज्यातील पावसाच्या धुमाशानीत शनिवार पर्यंत उरण मधील शेतकरी सुरक्षित होता.मात्र रविवारी सकाळी पासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने येथील कापणीला आलेले भात पीके आडवी केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेली भात पीके कुजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसाच्या लहरीपणाचा सर्वात अधिक फटका हा येथील भात शेतीला बसतो. तर दुसरीकडे अगदी मेहनतीने आणि मोठ्या कष्टाने निसर्ग आणि शेतीशी नात सांगणाऱ्या शेतकऱ्यांवर हे संकट येऊन ठेपले आहे. याचा विचार शासन आणि कृषी विभागाने करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी पावसाला मे महिन्यातच सुरुवात झाल्याने पेरणी वाया जाण्याच्या भीतने शेतकऱ्यांनी सुरुवातीला भात पेरणी केली नाही. त्यानंतर पाऊस सारखाच कोसळत राहिला. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी जूनच्या पाच-सहा तारखेपासून पेरणीला सुरुवात केली. मात्र पावसाचा वेग वाढतच राहिला. त्यामुळे भातरोपे तयार न होताच भात कुजून गेले. यावेळी महागडी बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केली होती. ही बियाणे शेतकऱ्यांनी भातरोपे तयार करण्यासाठी वापरली. मात्र बियाण्याचे भातच शेतात कुजून गेल्याने, निसर्गाशी नाते सांगणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. असे असून देखील शेतकऱ्यांनी पुन्हा एक वार दुबार भात पेरणीची तयारी केली आहे. मात्र पाऊस थांबण्याचे नाव न घेत नसल्यामुळे तेही भात बियाणे शेतातल्या शेतात कुजून गेले होते. आता भात बियाणे केंद्रावर सुद्धा मिळत नव्हती. तसेच घरातील उरल्या सुरल्या भात बियाण्यांचा देखील शेतकऱ्यांनी वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्याच्या भाताची पंचायत झाली होती. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने या भात बियाणाला उगविण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे तालुक्याबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शेती ओसाड ठेवण्याची वेळ आली आहे.
खरीप हंगामातील भात पेरणीला जून महिन्यातच खरी सुरुवात करता आली नव्हती. आणि ज्या शेतकऱ्यांनी भात बियाणे पेरले होते. त्या शेतकऱ्यांचे भातराबातील बियाणेच पुरते कुजून गेले होते. त्यामुळे शेतकरी पुरता धास्तावला होता. धूळपेरणीला पावसामुळे संधीच मिळाली नाही. त्यामुळे धूळपेरणी भर पावसात करता आली नाही. दरवर्षी मृग नक्षत्रात शेतकरी पेरणी करतात .मात्र यंदा मान्सूनपूर्व पावसाने कहरच केल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या. आणि अनेक ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी भात पेरण्या केल्या त्या कुजून गेल्या आहेत. रानपाखरे भाताच्या राबातील भाताचे दाणे टिपून खात असल्यामुळे या रानपाखरांनीही शेतकऱ्यांना हैराण केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला असून, शेतकरी आता धास्तावले आहेत.
महागडी बियाणे खरेदी करून अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र भाताची उगवण व्यवस्थित रित्या न झाल्याने बळीराजा धास्तावला आहे. यावर्षी सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा राहिल्याने रोपांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला असून काही ठिकाणी उगवलेली रोपे फार कमकुवत असल्याचे कृषी मित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील व शेतकरी रमेश फोफेरकर यांनी सांगितले. महागडी बियाणे, वाढत्या मजुरीचे दर आणि भातरोपे कुजून गेल्यामुळे बहुतांशी शेतकरी यंदा भात शेती ओसाड ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. उरण तालुका हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असे. परंतु वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तालुक्यातील भात लागवड क्षेत्र कमी झाले आहे. उरण तालुक्यात आजही पारंपारिक पद्धतीने भातशेती केली जाते. मात्र पावसामुळे काही ठिकाणी खरीप हंगामातील भात पेरणी हवी तशी न झाल्यामुळे भातरोपे उगवलीच नाही. धूळपेरणीला संधी न मिळाल्यामुळे जी उन्हाची उब महत्त्वाची आहे. ती उब शेतात साचलेल्या पाण्यामुळे मिळाली नाही. त्यामुळे भात रोपांची अवस्था फार बिकट आहे. महत्त्वाचे म्हणजे भात लागवडीसाठी भात रोपेच मिळाली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना भात शेतीची लागवड करणे अवघड झाले होते. यामुळे उरण तालुक्यातील भात शेती संकटात आली होती.
उरण तालुका हा राज्यातील औद्योगिक तालुका बनला आहे. त्यामुळे येथील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी उरणच्या नागाव,केगाव,चाणजे व खोपटे,कोप्रोली, चिरनेर, विंधणे, रानसई, वशेणी, पूनाडे, आवरे पाले, पिरकोन, वेश्वी, गोवठणे, बोरखार आदी गावात भात शेतीचे पीक घेतले जात आहे. हे साधारण २ हजार ५०० हेक्टर पेक्षा अधिक आहे. यातील बहुतांशी शेती ही खाडी किनाऱ्यावर आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी शेतीत शिरून शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर येथील विविध उद्योगामुळे शेतीतील पाण्याच्या नैसर्गिक वाटाच बंद केल्याने काही शेती नापिकी होत आहे. अशा सर्व संकटांचा सामना करीत उरण मधील शेतकरी मेहनतीने व नेटाने शेती करीत आहे. परंतु यावर्षी पाऊस उशिरा आला.तर त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेती योग्य पाऊस झाला. त्यावेळी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर अतिवृष्टी झाली आणि त्यात आलेली पिके कुजून वाया गेली होती. त्यामुळे पुन्हा पेरणी करावी लागली. त्याच्रमाणे काही ठिकाणी पिकावर करपा रोग आला आहे. पाऊस थांबला होता अशातच भात पिके मूळ धरू शकली नाहीत.त्यातच सध्या नुसत ढगाळ वातावण निर्माण झाल्याने पिकावर तूर्तुऱ्या रोगाचा ही प्रादुर्भाव वाढू लागला असून शेतकऱ्यांची शेती हातची जाण्याची वेळ आली होती. या सर्वांवर मात करीत भात पीके कापणीला आल्याने शेतकरी आनंदला होता. मात्र रविवारी झालेल्या पावसाने हातात आलेली भात पीके जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती चिरनेर येथील प्रगतिशील शेतकरी प्रफूल खारपाटील यांनी दिली आहे.