पावसाळ्याच्या तोंडावर नवी मुंबईत डेंग्यू आणि हिवतापासारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढत चालला असून, डेंग्यूचे संशयित रुग्ण वाढत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ या अभियानाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक आणि जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलैपासून ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ या मोहिमेअंतर्गत २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात मलोरिया व डेंग्यू प्रतिबंधक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. २ आणि ३ जुलै रोजी घेण्यात आलेल्या ५२ शिबिरांमध्ये एकूण २२,६९० नागरिकांनी भेट दिली असून त्यामधून १,३१० रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ६ जुलै २०२५ दरम्यान एकूण ८७,७८९ रक्तनमुने तपासण्यात आले असून त्यामध्ये डेंग्यूचे १९४ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७८ नमुने पुणे एनआयव्ही आणि सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये २ डेंग्यू बाधित रुग्णांचीही नोंद झाली आहे. तर हिवतापाचे एकूण १८ बाधित रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी २८ जून पर्यंत करण्यात आलेल्या तपासणी अहवालानुसार डेंग्यूचे एकूण १६२ संशयित रुग्ण आढळले होते. त्यामुळे ६ जुलैपर्यंत वाढलेल्या डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने एप्रिलपासून आतापर्यंत २८६ जनजागृती शिबिरे आयोजित केली असून, त्यामध्ये एकूण १,१२,८८७ नागरिकांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, डासउत्पत्ती रोखण्यासाठी शिबिरांमध्ये प्रात्यक्षिके, माहितीपत्रके आणि आरोग्य सल्ला देण्यात येत आहे. १० जुलै रोजी झालेल्या शिबिरांमध्ये एकाच दिवशी ११,३१२ नागरिकांनी भेट दिली आणि ६२४ रक्तनमुने तपासण्यात आले.
“घरातील आणि परिसरातील साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू व मलेरिया फैलावत असतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गॅलरी, टेरेस आणि घराभोवती असलेले भंगार साहित्य वेळोवेळी काढून टाकावे,” असे आवाहन करत महापालिकेने वैयक्तिक तसेच सामाजिक स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेद्वारे नवी मुंबईत साथीचे रुग्ण आटोक्यात ठेवण्यासाठी महापालिका सज्ज असून नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.