नवी मुंबई : एरव्ही नियोजित आणि नीटनेटक्या रस्त्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमधील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली असून कधी नव्हे इतक्या तक्रारी यंदा रस्त्यांच्या निकृष्ट दर्जासंबंधी येऊ लागल्या आहेत. महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी मागील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीतही हा मुद्दा पुढे आला. या बैठकीत रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामांना वेग द्या असे आदेश आयुक्तांना दिले. या कामांमध्ये हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
गेल्या वर्षभरात मात्र शहरातील रस्त्यांची अवस्था कधी नव्हे इतकी वाईट बनली आहे. वाशीसारख्या शहरातही अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याचे चित्र आहे. नेरुळ, सीबीडीची अवस्था तर दयनीय बनली आहे.ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली यासारख्या उपनगरांमधील रस्त्यांची अवस्थाही वेगळी नाही. ठाणे-बेलापूर रस्त्याची अवस्थाही वाईट आहे. यासंबंधी शहरातील जुने जाणते रहिवाशी, सुजाण नागरिक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सातत्याने तक्रारी करत आहे. मात्र अभियंता विभाग ढिम्म असल्याचे चित्र आहे. काही विभागांमधील कार्यकारी अभियंता तर रस्ते खराब नाहीतच असा दावा करण्यातच मग्न आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रश्नावर महापालिका आयुक्तांना उशीरा का होईना जाग आल्याचे चित्र नुकत्याच विवीध विभागांच्या आढावा बैठकीत दिसून आले.
मागील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पातील कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ही बैठक आयोजित केली होती. रस्त्यांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याचा मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला. रस्त्यांच्या सुधारणा कामांना वेग द्या, असे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले. तसेच रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करावी, कोणत्याही प्रकारची सबब चालणार नाही असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. पावसाची उघडीप मिळेल तशी रस्ता दुरुस्ती कामे प्राधान्याने करावीत असेही सांगितले. पावसामुळे रस्त्यांच्या कडेला चिखल साचत असून ऊन पडल्यावर या चिखलाची धूळ होऊन मोठ्या प्रमाणावर हवेत पसरते.
या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत रस्ते धुण्यासाठी महापालिकेकडे असलेल्या वाहनांचा अधिक प्रभावी वापर करावा व त्याकरिता मलप्रक्रिया केंद्रातील पुनर्प्रक्रियाकृत शुद्धीकरण केलेले पाणी वापरावे असेही निर्देश देण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसन पलांडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे आणि इतर विभागप्रमुख, सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
अभियंता विभागाची निष्क्रियता
या बैठकीत महापालिका आयुक्तांनी रस्त्यांच्या दर्जाविषयी कठोर भूमिका घेतल्याने आता तरी महापालिकेचा अभियंता विभाग कामाला लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसाने उघडीप घेतल्यानंतरही महत्त्वाच्या उपनगरांमधील रस्त्यांची दुरुस्ती होत नाही असा अनुभव आहे. वाशीसारखे शहराचे महत्त्वाचे केंद्र कधी नव्हे ते खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे. आयुक्तांनी कान उपटल्यानंतर तरी कार्यकारी अभियंते या आघाडीवर काम करतील का असा सवाल आता उपस्थित होत आहे.
