नवी मुंबई : “आमच्या नेत्यावर टीका केल्यास, युतीधर्म बाजूला ठेऊन आम्हीही प्रत्युत्तर देऊ.” असा थेट इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांना दिला आहे. वाशीत पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार नरेश म्हस्के बोलत होते. “यापुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोणी चुकीच्या पद्धतीने टीका केली तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं” हाच संदेश कार्यकर्त्यांना देण्यासाठी हा मेळावा असल्याचे खा. म्हस्के यांनी स्पष्ट केले. यामुळे आता नवी मुंबईच्या राजकारणात दोन्ही पक्षातील वाद शमतात की अधिक वाढतात? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

नवी मुंबईत येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलेले पहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप अर्थात वन मंत्री गणेश नाईक यांच्या मधून विस्तव जात नसून, दोन्हीकडून एकमेकांना प्रत्युत्तर देण्याची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. वन मंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रावणाची उपमा दिल्यानंतर खा. नरेश म्हस्के यांनी पलटवार करत गणेश नाईक यांना थेट इशारा दिला आहे.

महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती कायम राहणार की स्वबळावर लढणार याबाबत खा. नरेश म्हस्के यांना विचारले असता, “आमचा भाजपबद्दल कधीच दुरावा नाहीए, उलट भाजप-भाजपमध्येच दुरावा आहे. महायुती म्हणूनच आम्ही लढणार, ज्यांना वेगळं लढायचं असेल त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा.” अशी स्पष्टोक्ती खा. नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गणेश नाईक यांनी केलेली टीका शिवसेना शिंदे गटाला चांगलीच झोंबल्याचे दिसून येत आहे. शिंदेंवर होत असलेल्या टिकेबाबत भाजप नेत्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातलेल्या असल्याचे खा. म्हस्के यांनी सांगितले. त्यामुळे या पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणारी टीका सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा खा. म्हस्के यांनी दिला आहे.

प्रभाग रचनेच्या आरोपांवर खासदारांचे स्पष्टीकरण

नवी मुंबई भाजपकडून महापालिकेच्या प्रभाग रचनेबद्दल होणाऱ्या आरोपांवर खा. नरेश म्हस्के यांनी स्पष्टीकरण दिले आहे. २०११ च्या प्रभाग रचनेनुसारच आताची प्रभाग रचना करण्यात आली असून, आमचा यात कोणताही हस्तक्षेप नसल्याचे खा. म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, नवी मुंबईत युती करण्याची कोणाची इच्छा नसेल तर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढण्यास सक्षम असल्याचे खा. नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.