भौगोलिक स्थिती, शहरीकरणाचा परिणाम
राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना ठाणे आणि मुंबईपेक्षा नवी मुंबईचे तापमान एक ते दोन अंश सेल्शियसने वाढले आहे. मुंबई, ठाण्यापेक्षा नवी मुंबईची भौगोलिक रचना वेगळी आहे. खाडी आणि डोंगराच्या मध्ये शहर वसल्याने आद्र्रता कमी असली तरी तापमान अधिक आहे. याला निसर्गसंपदेचा तुटवडा आणि वेगाने वाढलेले सिमेंटचे जंगल ही कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबईत सोमवारी दुपारी तापमान ३२ अंश सेल्शियस असताना नवी मुंबईत मात्र ते ३५.२९ अंश सेल्शियस एवढे होते. त्याच वेळी ठाण्याचे तापमान ३२ डिग्री होते. मुंबई, ठाण्यापेक्षा वेगळी भौगोलिक रचना, वेगाने वाढलेले शहरीकरण आणि औद्योगिकीकरण याला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदा उन्हाळा नेहमीपेक्षा एक महिना आधीच सुरू झाला आहे. मुबलक निसर्गसंपदा असलेल्या भिरा गावात काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. आगामी काळात उष्णतेची लाट पसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा हवाला देऊन राज्य सरकारने वर्तविला आहे. दुपारी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असे सुचविण्यात आले आहे.
सिडकोने नवी मुंबई शहर वसविताना ४६ टक्के जमीन मोकळी ठेवली आहे, मात्र या जागेत निसर्गसंपदा म्हणावी तितकी नाही. विकासाच्या नावाखाली सिमेंटचा अमर्याद वापर करून शहराचा ‘विकास’ करण्यात आला आहे. त्यात १००पेक्षा जास्त दगडखाणींनी येथील डोंगर पोखरून टाकले आहेत. तापमान नियंत्रित ठेवणारी झाडेही फारशी नाहीत. सिडकोने लावलेले वृक्ष अल्पजीवी ठरले आहेत. काही झाडे नवीन तंत्रज्ञानाने फेररोपण करण्याचा देखावा तयार केला जात आहे. सिडको व पालिकेने विकसित केलेले २०० उद्याने हाच काय तो नैसर्गिक ठेवा शिल्लक राहिला आहे. घणसोली येथील गवळी देवसारखे डोंगर उन्हाळ्यात अक्षरश: ओसाड पडलेले दिसतात. नोसिल हा कारखाना त्यांच्या सांडपाण्यावर हा डोंगर उन्हाळ्यातही हिरवागार राहावा, यासाठी काळजी घेत होता. त्यानंतर या डोंगराकडे दुर्लक्ष झाले आहे.
मुंबईतील आद्र्रता जास्त आहे, पण तेथील तापमान कमी आहे. नवी मुंबईत आद्र्रता कमी असली तरी तापमान थोडे जास्त आहे. मुंबईला थेट समुद्रकिनारा आहे, तर नवी मुंबईला खाडीकिनारा आहे. तापमानच नाही तर भरती-ओहोटीमध्येही मुंबईत नवी मुंबईत फरक आहे.
– मोहन डगांवकर,
शहर अभियंता (पर्यावरणतज्ज्ञ)