दिघा येथील इलठण पाडा परिसरात ब्रिटिशांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी डोंगरात दगडी बंधारा बांधून धरण बांधले आहे. पण या धरणाच्या पाण्याचा रेल्वे आता उपयोग करीत नसून धरणाच्या पाण्याचा वापर नवी मुंबईकरांना करता आल्यास नवी मुंबईकर पाण्याच्या टंचाईपासून मुक्त होतील, त्या दृष्टीने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी दिघा येथील या ब्रिटिशकालीन धरणाची पाहणी केली. या संदर्भात रेल्वे प्रशासनाला (डीआरएम) पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यात धरणातील पाणी नवी मुंबई पालिकेला देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील दिघा परिसरामधील इलठण पाडा या ठिकाणी रेल्वेचे ब्रिटिशकालीन धरण आहे. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी हिल्टन यांनी ही जागा शोधली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी ब्रिटिशांनी दिघा येथे धरण बांधले आहे. ते ५० दक्षलक्ष लिटर्स क्षमतेचे असून २० एकर परिसरात हे धरण आहे. ते ४० फुटांपेक्षा अधिक खोल आहे. पण या धरणाच्या पाण्याचा रेल्वे आता उपयोग करीत नाही. रेल्वेचे या धरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. या धरणाच्या पाण्याचा वापर आजूबाजूचे आदिवासी आणि झोपडपट्टीतील नागरिक कपडे धुण्यासाठी वापरतात.
पण राज्यातील दृष्काळजन्य परिस्थिती पाहता या धरणातील पाण्याचा वापर नवी मुंबईकरांना होऊ शकतो असा विचार आल्यावर यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने रेल्वे प्रशासनाला हे धरण ताब्यात देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. पण रेल्वे प्रशासनाने याला नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण यंदाची दृष्काळजन्य परिस्थिती पाहता नवी मुंबई महापालिकने ठाणे जिल्हाच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांना धरणातील पाणी मिळण्यासाठी साकडे घातले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी धरणाची पाहणी केली असून रेल्वे प्रशासनाला या धरणातील पाणी नवी मुंबई महापालिकेला देण्यात यावे यासाठी पत्र दिले आहे. रेल्वेने या धरणातील पाणी वापरासाठी मंजुरी दिल्यास नवी मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिघा येथील रेल्वेच्या ब्रिटिशकालीन धरणाचे पाणी नवी मुंबईकरांना मिळावे यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने मागणी केली आहे. त्याअनुषंगाने धरणाची पाहणी केली असून धरणातील पाणी वापरासाठी योग्य असून हे पाणी नवी मुंबईकरांना मिळाल्यास त्यांची तहान भागणार आहे. रेल्वेने या धरणातील पाणी नवी मुंबई महानगरपालिकेला द्यावे यासाठी रेल्वेला पत्रव्यवहार केला आहे.
– डॉ. अश्विनी जोशी, जिल्हाधिकारी, ठाणे</strong>

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai to get water from dam at digha
First published on: 23-03-2016 at 02:11 IST