उरण : भेंडखळ मार्गावर एका अवजड कंटेनर वाहनाने धडक दिल्याने शुभम पाटील हा तरुण आश्चर्यकारकरित्या बचावला. या घटनेनंतर पुन्हा एकदा येथील दुचाकीस्वार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वाढत्या अपघातांमुळे अपघाताचे भय इथले संपत नाही अशी स्थिती या परिसरात निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वी उरण पनवेल मार्गावरील गव्हाण फाटा येथे दुचाकीला अपघात होऊन मयुरेश सुनील म्हात्रे या तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उरण व जेएनपीए बंदर परिसरातील अवजड वाहनांच्या बेदरकारपणाचा प्रत्येय आला असून या वाहनांवर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी नवी मुंबईच्या वाहतूक उपआयुक्तांकडे केली होती.

जेएनपीए प्रभावित क्षेत्रात रोज दिवस-रात्र हजारो ट्रेलर-कंटेनर तसेच इतर जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या क्षेत्रात पूर्वीपासूनची हजारो लोकवस्तीची गावे असल्यामुळे, तेथील नागरिकांना रोजची बाजारहाट, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, नातेवाईकांकडे सुख-दुःखात ये-जा करणे यासाठी आणि इतर जनतेलाही याच भयानक वाहतूकीतून मार्ग काढत जावे लागते. त्यामुळे अपघात होवून अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत, कित्येक जखमी झाले आहेत. मागील १५ वर्षांत अनेक अपघात झाले आहेत. यात मुख्य मार्गासह अंतर्गत मार्गातही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघाताला या मार्गांच्या खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक होणारे दुर्लक्ष हे एक मुख्य कारण ठरत आहे. या परिसरातील मार्गांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही सिडकोची असतांना त्यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष होते. सोमवारी झालेल्या अपघातात येथील खड्डा हा महत्वाचा ठरला आहे.

अवजड आणि प्रचंड प्रमाणावर होणाऱ्या वाहतुकीचे नियमन होणे गरजेचे आहे. त्यामुळे ट्रेलर-कंटेनर दोन मार्गिकांतून जाण्याची परवानगी देण्यात यावी. जेएनपीए ते कळंबोली ‘डी पॉईंट’ राष्ट्रीय महामार्ग (NH348A) आता बहुतांश ठिकाणी दोन्ही बाजूंनी चार मार्गिकांचा (लेन) झालेला आहेत त्यामुळे ट्रेलर-कंटेनर आणि इतर जड वाहनांना फक्त डावीकडील दोन मार्गिकेतून जाण्याची परवानगी द्यावी. उर्वरित दोन लेन दुचाकी, कार इ. हलक्या वाहनांसाठी राखून ठेवाव्यात. सध्या या चारही मार्गिकेतून ४० फूट लांबीचे अजस्त्र ट्रेलर-कंटेनर, डंपर आदी वाहने चालत असतात. त्यातून मार्ग काढत पुढे जाणे हलक्या वाहनांना किती जिकिरीचे होत असेल याचा आपण विचार करावा. साक्षात, जीवघेण्या खिंडीतून प्रवास होत असल्याचा ताण वाहनचालक आणि प्रवाशांवर होत आहे.

महामार्गावरील ट्रेलर-कंटेनरच्या अनधिकृत पार्किंगला पूर्णतः प्रतिबंध करणे वस्तुतः राष्ट्रीय महामार्गावर एकही वाहन उभे राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जेएनपीए प्रभावित क्षेत्रातीलराष्ट्रीय महामार्गावर रोज शेकडो ट्रेलर-कंटेनर अनधिकृतरित्या पार्किंग केलेले असतात. त्यामुळेही या क्षेत्रात वाहतुकीला अडथळे निर्माण होतात, जीवघेणे अपघात होत आहेत यावर उपाययोजना करावी. सेवा(सर्व्हिस) मार्गावर अनधिकृत पार्किंग अनेक ठिकाणी महामार्गाला समांतर सेवा मार्ग तयार करावेत.

तर ट्रेलर-कंटेनरवर क्लिनरची नेमणूक करावी. त्याचप्रमाणे जेएनपीए प्रभावित क्षेत्रातील अपघात, वाहतूक कोंडी, अपुऱ्या पायाभूत सुविधा, विविध विभागांतील समन्वयाचा अभाव या संदर्भात उरण सामाजिक संस्थेच्या प्रयत्नाने २०१३ मध्ये राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समन्वय समिती स्थापन झाली होती. त्याची पुनर्स्थापना करावी आदी सूचना करण्यात आल्या आहेत.मार्गावरील वाहनांचा ठिय्या कायम : उरणच्या द्रोणागिरी नोड तसेच खोपटे,दिघोडे आदी परिसरातील रहदारीच्या मार्गावर उभी करण्यात येणारी अवजड वाहने यामुळे मार्ग अरुंद बनले आहेत. परिणामी प्रवासी व लहान वाहने यांचे अपघात वाढले आहेत.