नवी मुंबई : नेरुळ येथील बहुचर्चित लोटस तलाव परिसराचे भू-सत्य तपासण्याचे काम राष्ट्रीय शाश्वत तटीय व्यवस्थापन केंद्राने पूर्ण केले आहे. या तपासणीनंतर लवकरच या तलावाला पाणथळ जागेचा दर्जा मिळू शकतो, असे चित्र आहे. ही जागा सिडकोने भराव करून विकण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे महापालिकेनेही या जागेवर सुविधांसाठी आरक्षण टाकले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींनी आपला लढा अधिक तीव्र केला आहे.
दरम्यान, राज्य पर्यावरण विभागाने २६ ऑगस्ट रोजी आपल्या संकेतस्थळावर लोटस तलावाचा उल्लेख पाणथळ असा केला आहे, असा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. राज्यातील इतर जलसंचयांसह पाणथळ जागेचे ‘संक्षिप्त दस्तऐवजीकरण’ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंबंधी तपासणी अहवालाची आम्ही वाट पाहात आहोत, अशी प्रतिक्रिया नॅटकनेक्ट फाउंडेशनने व्यक्त केली आहे. यासंबंधी या संस्थेने माहितीच्या अधिकारात काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांच्या उत्तरात हा अहवाल जिल्हा पाणथळ जागा समितीला पाठवण्यात येईल, असे पर्यावरण विभागाचे सार्वजनिक माहिती अधिकारी आणि शास्त्रज्ञ-२ नीलेश पोतेदार यांनी पत्राद्वारे म्हटले आहे. राज्यातील पाणथळ जागांचे मॅपिंग आणि दस्तऐवजीकरण करण्याचे काम एनसीएससीएमने केले आहे. सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळमधील कचरा टाकून पाणथळ जागेचे अंशतः डंपिंग केल्याबद्दल हरित गटांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिडकोचा दावा
सिडकोने यापूर्वी यासंबंधी भूमिका स्पष्ट करताना लोटस तलाव हा मानवनिर्मित जलस्रोत असल्याचे म्हटले आहे. या भूखंडाची विक्री यापूर्वीही करण्यात आली होती असा सिडकोचा दावा आहे. इंडियन एअरलाइन्सच्या अधिकारी, कर्मचारीवर्गाच्या निवासस्थानासाठी वसाहत उभारणीसाठी हा भूखंड देण्यात आल्याचा सिडकोचा दावा आहे. दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनीही हा तलाव वाचावा यासाठी प्रयत्न केले आहेत. याबाबत सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
रामसर कन्व्हेन्शनच्या व्याख्येनुसार, पाणथळ जागा म्हणजे “दलदल, कुंपण, पीटलँड किंवा पाण्याचे क्षेत्र, नैसर्गिक असो वा कृत्रिम, कायमस्वरूपी असो वा तात्पुरते, स्थिर किंवा वाहणारे, ताजे, खारे किंवा खारे पाणी असलेले क्षेत्र, ज्यामध्ये कमी भरतीच्या वेळी सहा मीटरपेक्षा जास्त खोली नसलेल्या सागरी पाण्याचे क्षेत्र समाविष्ट आहे. त्यामुळे सिडकोने तात्काळ लोटस तलाव पाणथळ तलाव म्हणून घोषित करावा. – बी. एन. कुमार, संस्थापक नॅटकनेक्ट फाउंडेशन