नवी मुंबई – आईच्या प्रकृतीमुळे आईच्या दुधापासून वंचित राहणार्या नवजात बालकांना आईचे दूध मिळावे म्हणून नवी मुंबई शहरात प्रथमच मातृ दुग्ध पेढी (मदर मिल्क बॅंक) सुरू होत आहे. नेरुळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात ही मातृ दुग्ध पेढी सुरू होणार असून, या संदर्भातील निविदा प्रक्रियेचे काम सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही मातृ दुग्ध पेढी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
मीनाताई ठाकरे रुग्णालयात मातृ दुग्ध पेढी सुरु होताच, स्तनदा मातांचे अतिरिक्त दूध संकलित करून ते मीनाताई ठाकरे रुग्णालयासह शहरातील इतर रुग्णालयांतील मातेच्या दुधापासून वंचित झालेल्या नवजात बालकांना पुरविण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ही दुसरी मातृ दुग्ध पेढी असणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
बाळाच्या जन्मानंतर त्याला अर्ध्या तासात स्तन पान करणे गरजेचे असते. पण अनेक वेळा मातेच्या शारीरिक व्याधींमुळे तिचे दूध बाळाला दिले जात नाही. अशावेळी आईचे दूध मिळत नसलेल्या नवजात बालकांना बाजारातील पावडरचे दूध दिले जाते. पण याचा विपरीत परिणाम नवजात बालकाच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. नवजात बालकांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी आईचे दूध सर्वात उपयुक्त ठरते.
मग ते स्वत:च्या आईचे असो किंवा दुसऱ्या मातेकडून मिळाले तरी चालते. मातृ दुग्ध पेढीत अशाच प्रकारे स्तनपान करणाऱ्या महिलांचे अतिरिक्त दूध संकलित केले जाते. संकलित केलेल्या दुधावर योग्य ती प्रक्रिया करून जे बालक आईच्या दुधापासून वंचित आहेत, त्या बालकांना हे दूध दिले जाते.
राज्यातील पहिली मातृ दुग्ध पेढी सायन रुग्णालयात सुरू करण्यात आली. त्यानंतर, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मातृदूग्ध पेढी सुरु करण्यात आली. त्यासह, राज्यातील विविध जिल्ह्यांमधील काही शासकिय रुग्णालयांमध्ये मातृ दुग्ध पेढी सुरु झाली. आता, त्यापाठोपाठ, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मातृदूग्ध पेढी सुरु होणार आहे. या संदर्भातील निविदा प्रक्रियेचे काम सुरू आहे. नेरुळ येथील मिनाताई ठाकरे रुग्णालयात येत्या दोन ते तीन महिन्यांत मातृदुग्ध पेढी नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मातृ दुग्ध पेढी (मदर मिल्क बँक) संकल्पना काय ?
प्रसुती झालेल्या मातेमध्ये दररोज ४०० ते ७०० मि.ली दूध तयार होते. त्यातील ५०० मि.ली दूध बाळासाठी पुरेसे असते. उर्वरित दुध वाया जाते. मातांचे वाया जाणारे हे दुध संकलित करण्यासाठी जनजागृती केली जाते. पेढीत हे दूध संकलित केले जाते. ते दूध संकलित करताना, मातेकडून तसेच ज्या बालकांना दिले जाणार आहे. त्या बालकाच्या नातेवाईकांकडून त्या संदर्भात लेखी घेतले जाते. त्यानंतरच ते दूध बालकाला दिले जाते. हे दूध संकलित केल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करुन निर्जंतूकीकरण केल्यावर ते दूध गरजवंत बालकांना दिले जाते.
मीनाताई ठाकरे रुग्णालयात मातृ दुग्ध पेढीची सुविधा
नेरुळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात एका महिन्याला अंदाजे ३०० ते ३५० महिलांची प्रसूती होते. त्यामुळे या रुग्णालयात सुरू होणार्या मातृ दुग्ध पेढी (मदर मिल्क बँक) मध्ये एकावेळी ३५० ते ४०० लीटर दुधाचा साठा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे दूध पुढील सहा महिन्यांपर्यंत कसे चांगले राहिली यासाठी त्यावर विशेष प्रक्रिया केली जाणार आहे.
मीनाताई ठाकरे रुग्णालयातील आईच्या दुधापासून वंचित असलेल्या नवजात बालकांसह इतर रुग्णालयातील नवजात बालकांना देखील ही सेवा पुरविली जाणार आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेमार्फत देण्यात आली.