नवी मुंबई : अमली पदार्थ (एमडी) विक्रीप्रकरणी नेरूळ पोलिसांनी नुकतीच ज्या दोन आरोपींवर कारवाई केली त्यांनी घरच्या गरिबीला कंटाळून हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. अमली पदार्थ वितरण आणि विक्री करण्यासाठी अल्पशिक्षित आणि हलाखीच्या स्थितीत असलेल्यांना हाताशी धरून रातोरात श्रीमंत होण्याचे आमिष दाखवले जात असल्याचे तपासात वारंवार समोर येत आहे.
अमली पदार्थात सर्वात लोकप्रिय झालेल्या म्याऊ म्याऊ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या एमडीची (मेथाक्वाँलोन) विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना नेरूळ पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले होते. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी पोलिसांनी सुधारगृहात केली, तर दुसरा आरोपी नदीम शरीफ बदायू याला न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेरूळ स्टेशननजीक सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली.
आरोपींकडून २३ लाख १० हजार रुपयांचे ७६८ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. यातील नदीम हा उत्तर प्रदेश भूसोली जिल्ह्य़ातील कव्वाटोला या खेडेगावचा असून दोन्ही आरोपींनी हा गुन्हा पहिल्यांदाच केल्याचे तपासात समोर आले आहे. दोघांच्याही घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यात हाताला काम नाही. त्यामुळे त्यांना एका मित्राच्या ओळखीने हे काम मिळाले. यासाठी साधारण एक लाख रुपये देऊ , असे आमिष त्यांना दाखवण्यात आले होते. गेल्या महिन्यात दोघेही नवी मुंबईत याच कामासाठी आले असता एमडीचा व्यवहार नक्की केला होता. एवढे पैसे मिळतील या आशेने रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत त्यांनी कामाला होकार दिला, मात्र पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या हाती बेडय़ा पडल्या.
प्रत्येकी ५० हजार रुपये
एमडी अथवा कुठलाही अमली पदार्थ वितरित करणारे हे बहुतांश स्वत:सुद्धा त्याचे व्यसन करीत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र या दोन्ही आरोपींना एमडी म्हणजे काय, त्याचे काय दुष्परिणाम होतात याची फारशी माहितीही नाही. दोघांनाही केवळ दीड हजार रुपये देऊन नवी मुंबईत पाठवण्यात आले होते.
एमडीचे ग्राहक हे सर्व स्तरांतील असले तरी त्याचे वितरण मात्र आर्थिक दुर्बल परिस्थिती आणि रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना हेरून त्यांच्याकरवी करून घेतले जाते. यात अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून मुख्य आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
– अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरूळ