ग्रीकमधला पहिला डॉक्टर हिप्पोक्रॅटने नोंदवून ठेवलंय, की निरोगी राहण्यासाठी पहिलं औषध म्हणजे चालणं आहे. रोज स्वत:च्या प्रकृतीला झेपलं इतकं चालणं ठेवल्यास इतर औषधांची गरज कोणालाही भासणार नाही. हिंडताफिरता माणूस नेहमी धट्टाकट्टा राहतो, असं त्याला सुचवायचं आहे. म्हणजे कोणतेही शारीरिक श्रम हे रोगांना दूर ठेवतात. आजच्या धावत्या जगाने ताणतणाव दिले आहेत. त्यातून रक्तदाब, मधुमेह आदी आजारांची संगत प्रकृतीला जडते. हे आटोक्यात आणायचे तर काय करायचे तर चालायचे.. सकाळ आणि संध्याकाळ निरंतर चालायचे.. हाच चालण्याचा कित्ता गिरवणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढली आहे. शहरात पावले चालती ठेवणाऱ्यांची संस्कृती निर्माण झाली आहे. नवी मुंबई, पनवेलमधील वॉक संस्कृती सांगणारे ‘पाऊले चालती’ हे  साप्ताहिक सदर आजपासून..

नेव्हा गार्डन, ऐरोली सेक्टर २०

२१व्या शतकातील शहरातील नियोजनाचा फायदा नागरिकांना झाला, हे खरं आहे, पण काही जागा या क्रमाक्रमाने आक्रसत गेल्याचे भान नागरिकांना आले आहे. शहरातील उद्याने आणि ‘जॉगिंग ट्रॅक’चे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. यातूनच ऐरोलीत सकाळी चालणाऱ्यांची आणि व्यायाम करणाऱ्यांची संस्कृती तयार झाली, त्याविषयी..

वय वाढल्यानंतरच ‘वॉक’ घ्या असे कुठे लिहून ठेवलेले नाही. रोज चालणाऱ्यांमध्ये केवळ वयस्कच नाहीत, तर तरुण आणि तरुणाई ओलांडलेल्यांची संख्या मोठी आहे. ‘नेव्हा गार्डन’मध्ये येणारे वय आणि तब्येतीनुसार व्यायामाचे प्रकार करतात. या उद्यानात विरंगुळा कट्टा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे निवृत्त झालेले नागरिक आणि आराम शोधण्यासाठी आलेले येथे काही काळ बसतात. सकाळी चालण्यासाठी आलेले नागरिकांनी आरोग्यसोबतच पर्यावरणाचीही काळजी घेतली आहे. उद्यानात विविध प्रकारच्या झाडांची रोपे लावली आहेत. त्यामुळे येथील प्रसन्नतेत अधिकच भर पडते. उद्यानात व्यायामाची विविध उपकरणेही बसविण्यात आली आहेत. येथे बॅडमिंटन खेळण्यासाठी जागा तयार करण्यात आली आहे. यात सत्तरीचे वयस्क आणि तरुणांचा समावेश आहे. याशिवाय उद्यानात संगीत ऐकण्याची सोय आहे.

‘नेव्हा’ सिडकोच्या भूखंडावर विकसित करण्यात आले आहे. अर्थात ते भाडे तत्त्वावर घेण्यात आले आहे. अलीकडेच उद्यानात नियमित येणाऱ्यांनी एकत्र येऊन ‘हरी ओम जॉगर्स ग्रुप’ स्थापन केला आहे. या गटाने एक पाऊल पुढे जात उद्यानाचा कायापालट करण्याचे ठरवले आणि ते अमलातही आणले.

नागरिकांनी दिलेल्या देणगींतून हा विकास साधण्यात आला आहे. याशिवाय उद्यान वाढविण्यासाठी सिडकोकडे अधिक जागेची मागणी करण्यात आली आहे. उद्यानात स्वच्छतागृहाची सोय नाही. ती पूर्ण करण्यात यावी, अशी अपेक्षा येथील काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. आसनव्यवस्था हा येथील सर्वात आरामदायी अनुभव आहे. उद्यानाच्या दोन्ही बाजूंनी कट्टे तयार करण्यात आले आहेत. येथे त्यामुळे निवांतपणा मिळतो आणि एकमेकांशी संवादही साधला जातो. काही अनामिक नातीही तयार झाली आहे.

उद्यानात वाचनालय आहे. त्यामुळे काही जण बौद्धिक व्यायामाला प्राधान्य देतात. या उद्यानात योग करण्यासाठी काही जण येतात. पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना पोलीस कर्मचारी मार्गदर्शन करतात. महापालिकेकडे नागरिकांनी ई-टॉयलेटची मागणी केली आहे. पावसाळ्यानंतर येथील वृक्षांना पाणीपुरवठय़ाचा प्रश्न उद्भवत नाही. महावितरण कॉलनीतील विहिरीतील पाणी वापरण्यात येते.

उद्यानाबाहेर कडुलिंब, आवळा, कारले, तुळस, आले आणि गहू आदींचा रस मिळतो. गेली दोन वर्षे येथे अनेक रस उपलब्ध आहेत.

‘हरी ओम जॉगर्स ग्रुप’च्या वतीने महानगरपालिकेने ‘नेव्हा गार्डन’ ताब्यात घेऊन विकास करावा, अन्यथा तसा विकास करण्यासाठी नागरिकांना परवानगी द्यावी. याशिवाय उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली भूमाफियांनी अतिक्रमण करून उभारलेल्या झोपडय़ा हटवाव्यात आणि उद्यानाची रुंदी वाढवावी.

– संदीप कळंबे, संस्थापक,हरी ओम जॉगर्स ग्रुप

सकाळी चालण्यासाठी येणाऱ्यांना भेटण्याची उत्सुकता लागलेली असते. हितगुज केल्याने मन प्रसन्न होते.

आनंद नादुरंकर, ऐरोली

हे उद्यान आमच्यासाठी प्रसन्नतेचा झरा आहे. येथील ‘ओपन जिम’चा वापर केल्याने अनेक शारीरिक व्याधींवर मात करणे शक्य झाले आहे.

– शशिकला गिरपुंजे