उरण : न्हावा शेवा येथील सीमाशुल्क विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबई विभागाने देशात परदेशी बनावटीच्या सिगारेटची तस्करी करण्याचा एक मोठा प्रयत्न उधळून लावला आहे आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तस्करांनी कार्गोला कोटेड कॅल्शियम कार्बोनेट म्हणून घोषित करून सिगारेट आयात केली होती, जेणेकरून ते खरे आयात असल्याचे दिसून येईल आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल होईल.
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा बंदरात ही एक खेप पकडली आणि टॉप गन ब्रँड सिगारेटचे १,०१४ कार्टन (खोके) असलेले कंटेनर जप्त केले. त्या खोक्यांमध्ये एकूण १,०१,४०,००० सिगारेटच्या काड्या असून त्याची भारतात किमत १३.१८ कोटी रुपये आहे. आयातीसाठी असलेल्या एका व्यक्तीला डीआरआय अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले.
एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही आयात कस्टम कायदा आणि सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (पॅकेजिंग आणि लेबलिंग) नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. कस्टम कायद्याच्या तरतुदींनुसार ही खेप जप्त करण्यात आली आहे.
आरोग्यासाठी धोका
विदेशी मूळच्या सिगारेटच्या तस्करीमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल तोटा होतो आणि देशांतर्गत तंबाखू उद्योगात निष्पक्ष स्पर्धा बिघडते, तर सार्वजनिक आरोग्यासाठीही गंभीर धोका निर्माण होतो. हे बेकायदेशीर सिगारेट अनेकदा आरोग्य आणि सुरक्षा नियमांचे कायदेशीर पालन टाळतात, ज्यामध्ये COTPA कायद्यांतर्गत अनिवार्य केलेले नियम जसे की चित्रमय इशारे आणि सामग्री उघड करणे यांचा समावेश आहे.