निवारा को-ऑ. हा. सोसायटी लि., सानपाडा सेक्टर-३

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील सिडको वसाहतींमध्ये वाहने पार्किंगची समस्या सोडविण्यात सानपाडा सेक्टर तीनमधील ‘निवारा’ संकुलातील रहिवाशांना यश आले आहे. येथील सदस्यांनी अंतर्गत नियोजन करून ही समस्या सोडविली आहे. हे सारे करताना संकुल परिसरातील हिरवाई टिकवून ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे.

सानपाडा सेक्टर-३ मध्ये १९९५ मध्ये उभारलेल्या ‘निवारा’ संकुलात एकूण १४८ सदनिकाधारकांच्या चारचाकींच्या पार्किंगची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात आली आहे. सिडकोने संकुल उभारताना वाहनांसाठी जागा उपलब्ध करून दिलेली नव्हती, मात्र संकुलातील रहिवाशांनी सिडकोच्या जागेवर काही काळासाठी पार्किंगची सोय केली; या जागेवर ४० वाहनांची सोय करण्यात आली. निवारा संकुल हे रेल्वे स्थानक, मुख्य महामार्ग, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय यांपासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे येथील परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या संकुलात १३० चार चाकी तर ७० दुचाकींचा प्रश्न सोडविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. वाहनांच्या रांगा रस्त्यावर दिसणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेत पार्किंगवर तोडगा काढण्यात आला.

संकुलात प्रत्येक घरासमोरील मोकळ्या जागेत झाडांनी बहरलेली उद्याने साकारलेली होती. या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली. त्याचबरोबर संकुलातील हिरवळ अबाधित राहील याचीही दक्षता रहिवाशांनी घेतली आहे. पार्किंगची जागा उपलब्ध करून देताना नव्याने वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामुळे येथील झाडांची हिरवाई कायम राहिली आहे. वृक्षारोपण मोहीम राबवून अनेक प्रकारची फळे, फुले, औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये लिंब, शिसे, आंबा, फणस, नारळाची झाडे आहेत. ‘निवारा’ संकुलाला वनराई प्रतिष्ठान आणि खासगी बँकेकडून सर्वोत्तम संकुलाचा पुरस्कार मिळालेला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करत असलेली व्यवस्था दोन वर्षांपूर्वीच येथील नागरिकांनी सुरू केलेली आहे. तसेच परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी ‘गो ग्रीन’च्या माध्यमातून संकुलात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. संकुलातील सर्व नागरिक महिन्यातून एकदा एकत्र येऊन स्वत: परिसर स्वच्छ करताता. या ठिकाणी स्वतंत्र सभागृह असून सोसायटीतील रहिवाशी आणि सामाजिक संस्था या ठिकाणी विविध उपक्रम राबवितात. पतंजली योग समितीच्या वतीने नि:शुल्क रोज सकाळी योगाचे वर्ग तसेच संध्याकाळी नृत्याचे वर्ग भरविले जातात. लहानग्यापासून ते मोठय़ांपर्यंत व्यक्ती सहभागी होत असते. बुधवारी आणि गुरुवारी माता निर्मलादेवी सहयोगमधून आत्मचिंतन करण्याचे महत्त्व समजावून दिले जाते. श्री श्री रविशंकर यांचा हॅप्पीनेस हा कार्यक्रम होतो. रविवारी बजरंग दल स्व-संरक्षणाचे धडे देत असते. तसेच सभागृहाच्या बाजूला जिम उपलब्ध करून दिलेली आहे. आशा पद्धतीने येथील रहिवाशी आपले स्वास्थ्य कायम ठेवत आहेत.

संकुल हितासाठी खाटाटोप

संकुलात दोन पाण्याच्या टाक्या असून एक जमिनींअंर्गत तर एक मोठी सिमेंटची असा एकूण सव्वा लाख लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र येथील सदनिकांमध्ये एकच कॉमन पाण्याचा मीटर आहे. त्यामुळे येथील काही नागरिकांकडून पाण्याचा वाजवी वापर केला जातो. पाण्याचा होणार अपव्यय टाळण्यासाठी घरागणिक पाणी-मीटर बसवून घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सदस्यांचा खटाटोप सुरू आहे.

प्रत्येकाला वेगळे पाणी-मीटर बसविल्यास जसा वापर तसे पाणी-बिल या तत्त्वावर सुरू झाल्यास पाण्याच्या होणाऱ्या जास्तीच्या वापराला आळा बसेल असे मत व्यक्त होत आहे. तसेच संगणक, केबल, डिश टीव्ही यांचे जाळे सर्वत्र पसरले आहे, मात्र त्याबरोबर विजेच्या तारांचे जाळेही पसरत आहे. काही ठिकाणी या तारा लटकत असतात, त्या ठिकाणी शॉर्टसर्किटची समस्या उदाभवू शकते, यावर तोडगा काढण्यासाठी सर्वासाठी एकच कॉमन डिश टीव्ही बसविण्याची योजना आखण्यात येणार आहे.

नैसर्गिक साधनांच्या उपयोगावर भर

कचऱ्यापासून जैविक खत आणि मातीनिर्मितीवर हालचाली सुरू करणार असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केली आहे, तसेच सौरऊर्जेचा वापर व पर्जन्यजल संधारण योजना सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Niwara chs ltd navi mumbai sector 3 sanpada
First published on: 18-07-2017 at 00:56 IST