शहरबात : ‘सब का साथ सब का विकास’

आयुक्तांनी हाती घेतलेले महत्त्वाचे प्रकल्प तडीस नेण्याचे सूतोवाच नव्या आयुक्तांनी केले आहे

विकास महाडिक

सर्वपक्षीय संबंध दृढ ठेवून नव्या आयुक्तांनी नवीन शहराचा डोलारा सांभाळण्याची तयारी केली आहे. नवी मुंबई हे राज्यातील एकमेव नियोजनबद्ध शहर असल्याने या शहरातील पायाभूत सुविधा काही अपवाद वगळता पूर्ण झालेल्या आहेत. या पायाभूत सुविधांची वार्षिक देखभाल चांगल्या प्रकारे करण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. यापूर्वीच्या आयुक्तांनी हाती घेतलेले महत्त्वाचे प्रकल्प तडीस नेण्याचे सूतोवाच नव्या आयुक्तांनी केले आहे. अप्रत्यक्षात ‘सब का साथ सब का विकासचा’ नारा देत कामाची सुरुवात केली आहे.

नवी मुंबई पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पदभार स्वीकारून आता एक आठवडय़ापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अगोदरच्या दोन आयुक्तांपेक्षा काहीसे वेगळे असलेल्या मिसाळ यांनी मवाळ आणि जहाळ अशा दोन्ही भूमिका सोडून तटस्थ भूमिका स्वीकारण्याचे ठरविले असल्याचे दिसून येते. पालिकेतील सर्व पक्षांच्या पदाधिकारी, नगरसेवक यांच्याबरोबर जुळवून घेऊन शहराचा विकास करण्याचे त्यांचे धोरण आहे. ही एक चांगली बाब आहे. त्यामुळेच कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांशी अथवा त्यांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपले दरवाजे त्यांनी खुले ठेवले आहेत.

यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे नगरसेवकांना दुर्लक्षित करीत असल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासन असा एक वाद निर्माण झाला होता. त्याचा परिणाम मुंढे यांना दहा महिन्यांतच गाशा गुंडाळावा लागला. अधिकारी तसा चांगला, पण स्वभावाला औषध नसल्याने त्यांची उचलबांगडी मुख्यमंत्र्यांना करावी लागली. त्यांच्या जागी आलेले आयुक्त डॉ. रामास्वामी हे तसे स्वभावाने मवाळ. त्यामुळे पालिकेतील नगरसेवकांशिवाय सत्ताबाह्य़ केंद्राशी त्यांनी जवळीक साधली नाही. गोगलगाय म्हणून त्यांच्यावरही टीका झाली. त्याला उत्तर देताना थेट सात हजार छोटय़ामोठय़ा कामांची यादीच त्यांनी तयार करून नगरसेवकांच्या समोर ठेवली. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांची दोन वर्षे तीन महिन्यांनी बदली झाली. रामास्वामी यांचे काम समाधानकारक नव्हते किंवा त्यांच्याबद्दल तक्रारी होत्या म्हणून त्यांची बदली झाली असे नाही, तर त्यांना कोणी राजकीय वाली नसल्याने त्यांची एका दिवसात बदली करण्यात आली. नवी मुंबईत ठेवताना त्यांना सिडकोची जबाबदारी देण्यात येणार होती; पण त्यातही शेवटच्या क्षणाला बदल होऊन त्यांना कामगार आयुक्तसारख्या अडगळीत पदावर बोळवण करण्यात आली. त्यांच्या जागी आलेले मिसाळ गेली दोन महिने चांगल्या नियुक्तीसाठी प्रयत्नशील होते. मिसाळ यांना निवृत्तीसाठी आता तीन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आपल्या नियुक्तीच्या काळात कोणत्याही पक्षाशी अथवा नगरसेवकाशी वाद टाळून काम करता येईल याचा प्रयत्न मिसाळ करणार असल्याची चुणूक दोन आठवडय़ांत लागली आहे. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांबरोबर सलोख्याचे संबंध आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याशी जवळीक असल्याने भाजप सरकारमध्ये मिसाळ यांची चांगलीच ऊठबस आहे. त्याचा बाऊ न करता सर्वपक्षीय संबंध दृढ ठेवून आयुक्तांनी नवीन शहराचा डोलारा सांभाळण्याची तयारी केली आहे. नवी मुंबई हे राज्यातील एकमेव नियोजनबद्ध शहर असल्याने या शहरातील पायाभूत सुविधा काही अपवाद वगळता पूर्ण झालेल्या आहेत. या पायाभूत सुविधांची वार्षिक देखभाल चांगल्या प्रकारे करण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. मोकळ्या जमिनीला सिडकोच्या मालकीमुळे मर्यादा असल्याने बडे प्रकल्प हाती घेणे तसे मुश्कीलच आहे. मागील २५ वर्षांत तेही काम कमी अधिक फरकाने झालेले आहे. नेरुळ येथील वंडर पार्कच्या जागेत जादा एफएसआय घेऊन एक विज्ञान केंद्र उभारण्याचा माजी आयुक्तांचा प्रयत्न चांगला आहे. त्याला तडीस नेण्याची कामगिरी या आयुक्तांना पार पाडावी लागेल. याशिवाय शिरवणे येथे पशुरुग्णालय उभारण्याच्या कामाचा श्रीगणेशा या काळात करावा लागणार आहे. घणसोली येथे एक स्टेडियम बनविण्याचे काम अर्धवट आहे. ते या काळात पूर्ण करावे लागणार आहे. पामबीच विस्तार मार्गाला लागणारा अर्धा खर्च करण्याची तयारी सिडकोने दाखवली आहे. त्यामुळे वन तसेच पर्यावरण विभागाची परवानगी घेऊन वाहतूक कोंडीला पर्याय ठरू पाहणाऱ्या पामबीच मार्गाची उभारणी या आयुक्तांच्या काळात पूर्ण होईल अशा अपेक्षा आहे. पावसाळी नाल्यांची दिशा योग्य नसल्याने शहरात आता काही इंच पावसाने पाणी साचण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यावर कायम स्वरूपी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. दर पावसाळ्यात पंप लावून पाणी उपसण्याची कसरत पालिकेला लाजिरवाणे आहे. गावांचा विकास दुर्लक्षित झालेला आहे. ते या आयुक्तांना एक आव्हान आहे. शहराचा विकास आराखडा तयार असताना केवळ सत्ताधारी पक्षाच्या हट्टामुळे तो अडगळीत पडला आहे. पालिकेच्या विद्यार्थ्यांच्या चिक्कीचा प्रश्न न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. तोपर्यंत मुलांना चिक्की चघळण्यास देण्यात आली आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय सर्वंकष नसल्याने स्थगित आहे. रामास्वामी यांनी शहरातील सात हजार नागरी कामे पीटीएमएस प्रणालीने मुख्यालयाला जोडली आहेत. त्यामुळे प्रत्येक कामाची इत्थंभूत माहिती अधिकाऱ्यांच्या टेबलावर आहे. ही प्रणाली कायम राहण्याची आवश्यकता आहे. नवीन आयुक्तांनी अप्रत्यक्षात सब का साथ सब का विकासचा नारा देत कामाची सुरुवात केली असून त्यावर नवी मुंबईकरांची नजर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nmmc annasaheb misal started important projects work zws

ताज्या बातम्या