नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सात महिन्यांत सुमारे ५०० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे. यामध्ये नेरूळ विभागातून १०६ कोटी ७९ लाख रुपये असा सर्वाधिक मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. तर, ३१३ कोटी ७० लाख रुपये इतका कर ऑनलाईन माध्यमातून संकलित करण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिकेने पारदर्शक आणि कार्यक्षम कारभार व्हावे यासाठी अत्याधुनिक सेवा सुविधांचा वापर करण्यास सुरूवात केली होती. तसेच विविध जनजागृती मोहिमा देखिल राबवण्यात आल्या. यंदा डेटा विश्लेषणावर आधारित नाविन्यपूर्ण पध्दतीने कार्यवाही करण्याचे नियोजन पालिकेने केले होते.
त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये करसंकलनात वाढ करण्यासाठी डेटा विश्लेषण, मालमत्ताधारकांची माहिती अद्ययावत करणे आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या होत्या. यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर संकलन झाले असल्याचे मालमत्ताकर विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांकडून ऑनलाईन कर भरण्यास प्राधान्य
नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच याबाबत जनजागृती करण्यात आली होती. यामध्ये ८२९१९२०५०४ हा व्हॉट्सॲप क्रमांक, ‘My NMMC – माझी नवी मुंबई’ हे ॲप्लिकेशन, महापालिकेची http://www.nmmc.gov.in ही अधिकृत वेबसाईट, कर देयकांवरील क्यूआर कोड स्कॅनिंग तसेच विविध युपीआय माध्यमांद्वारे पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आल्या होत्या. या ऑनलाईन पर्यायांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर केला. यामुळे ३१३ कोटी ७० लाख रूपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने संकलित झाला.
एकूण किती कर वसूल आणी कसा ?
- नवी मुंबई महापालिकेच्या आठ विभागांतील १ लाख ६३ हजार २३ मालमत्ताधारकांकडून ५०० कोटी ११ लाख रुपयांचे कर संकलन झाले.
- सर्वात जास्त मालमत्ता कर नेरूळ विभागातून जमा झाला : १०६ कोटी ७९ लाख रुपये
- ऑनलाईन माध्यमांतून झालेले कर संकलन : ३१३ कोटी ७० लाख रुपये
- ऑफलाईन माध्यमांतून झालेले कर संकलन : १८६ कोटी ४१ लाख रुपये
मालमत्तेच्या प्रकारानुसार झालेले कर संकलन
- निवासी मालमत्ता : ३५ टक्के
- अनिवासी / व्यावसायिक मालमत्ता : २३.८४ टक्के
- औद्योगिक मालमत्ता : ३२.४५ टक्के
- मिश्र व इतर मालमत्ता : ८.७१ टक्के
