नवी मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून राज्यातील २४६ नगरपालिका तसेच ४२ नगरपंचायतींची निवडणूक २ डिसेंबरला होणार आहे. तर नवी मुंबई महापालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत ही ११ नोव्हेंबरला होणार असून १७ नोव्हेंबरला आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाणार आहे .
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता सर्वांचे लक्ष पालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागातील मतदार संख्येकडे तसेच निवडणूक प्रभाग आरक्षण सोडतीकडे लागले आहे. नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये चक्क आयुक्त बंगल्याच्या पत्त्यावर अनेक मतदारांची नोंद केली आहे.
तर एकीकडे एकाच मोबाईलवरुन अनेक नावे नोंदवण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता नवी मुंबई शहरात मागील काही दिवसापासून मतदार याद्यांचा घोळ समोर आल्याने सर्वांचे लक्ष आरक्षण सोडत तसेच मतदार यादीकडे आहे. अगोदर ६ नोव्हेंबरला प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्यात येणार होत्या परंतू आता या प्रारुप मतदार याद्या या १४ नोव्हेंबरला प्रसिध्द केल्या जाणार असल्याची शक्यता आहेत.
पालिका निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या मतदार यांद्यांमध्येच घोळ असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीसाठी पालिकेने प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम केले आले आहे. मनसेचे राज ठाकरेंसह इतरांनी १५ ऑक्टोंबरपर्यंतची यादी ग्राह्य धरण्याची मागणी केली होती.परंतू १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे आता ४ लोकप्रतिनिधींच्या एका प्रभागात किती मतदार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे त्यातील मतदार नक्की आहेत तरी कोण याचा शोध उमेदवारांना घ्यावा लागणार आहे.
नवी मुंबई शहरात आयुक्त बंगल्यासह शौचालयाच्या पत्त्यावर मतदार नोंदणी झाली असल्याने नक्की मतदार याद्या कशा असणार याची उत्सुकता अनेक राजकीय पक्षांना लागली आहे. मंगळवारी ११ नोव्हेंबरला विष्णुदास भावे नाट्यगृहात आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने सर्वच इच्छुकांचे लक्ष आता आरक्षण सोडत इकडे लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेत १११ सदस्य संख्या निश्चित असून ४ सदस्यांचे २७ प्रभाग तर ३ सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे.त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत होणार आहे. प्रभागात असलेले मतदार किती, ते कोणते याचा घोळ मतदार याद्या जाहीर होण्यापूर्वीच सुरु झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला असून नवी मुंबई महापालिकेनेही आदेशानुसार प्रभाग मतदार यादी विभाजनाची कार्यवाही करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी १ जुलै २०२५ रोजीच्या मतदार यादीचे विभाजन केले आहे. तर दुसरीकडे आता राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे १५ ऑक्टोंबरपर्यंतची यादी ग्राह्य धरण्याची परवानगी मागीतली होती परंतू १ जुलै पर्यंतची मतदार याचीच निश्चित आहे.
निवडणूक आयोगाने महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या व महापालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागांची संख्या यावर एका प्रभागातील मतदरांची संख्या निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे तसेच प्रभागनिहाय येणाऱ्या प्रारुप मतदार याद्यांकडे लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेची ७ वी निवडणूक आगामी काळात होणार असून अनेक वर्ष रखडलेल्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता प्रभागनिहाय मतदार यांद्यांकडे तसेच निवडणूक आरक्षण सोडतीकडे आहे. त्यामुळे आता ११ नोव्हेंबरला नवी मुंबई आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
महापालिकेत १११ प्रभाग असून ६ व्या निवडणुकी प्रमाणेच पालिकेत ५६ महिला व ५५ पुरुष लोकप्रतिनिधी असणार आहेत.यावेळीही महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्तच असणार आहे. १११ पैकी आरक्षित प्रभागांमध्ये अनुसूचित जातीसाठी १०,अनुसूचित जमातींसाठी २ ,नागरिकांची मागास प्रवर्गासाठी २९ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७० सदस्य संख्या असणार आहे.
आरक्षणाचा विचार करता चक्रानुक्रमे आरक्षण निश्चित करण्यात येईल अशी शक्यता आहे. परंतू आता ४ लोकप्रतिनिधींचा मिळून १ एक प्रभाग असणार आहेत. त्यामुळे त्यातील कोणता प्रभाग आरक्षित होतो याकडे आरक्षण सोडतीमध्येच निश्चित होणार आहे. तसेच एका प्रभागात किती मतदार येणार याकडेही आता इच्छुकांचे लक्ष आहे.
प्रभागरचनेनंतर निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार पालिकेने प्रभागातील प्रारुप मतदार याद्या विभागणीचे काम केले आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी १११ लोकप्रतिनिधी असणार आहेत. शहरातील २७ प्रभागात प्रत्येकी ४ लोकप्रतिनिधी तर १ प्रभागात ३ लोकप्रतिनिधी असणार आहेत. त्यामुळे ४ लोकप्रतिनिधींसाठी अंदाजे ३५ ते ४० हजार मतदार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागरचना करण्यात आली असून नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला विष्णुदास भावे नाट्यगृहातआरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. – भागवत डोईफोडे, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका निवडणूक विभाग.
असा हे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
- ११ नोव्हेंबर – आरक्षण सोडत काढली जाणार
- १७ नोव्हेंबर – आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध होणार
- १७ ते ते २४ नोव्हेंबर – दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्याची मुदत
त्यानंतर आरक्षणाची अंतिम अधिसूचना काढली जाणार.
