नवी मुंबई : नवी मुंबईत प्रचंड वाहतूक असलेल्या वाशी कोपरखैरणे मार्गावर एनएमएमटीने गेल्या काही दिवसापासून जुहू गाव येथून एक मार्ग बदल केला आहे. मात्र काहीही गरज नसलेल्या या मार्गबदलाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होत असून प्रवासवेळेत किमान १० ते गर्दी प्रसंगी २० मिनिटे वाढ होत आहे. जुहू गाव येथे नव्याने बनवण्यात आलेल्या व्यापारी संकुलातून बस फेरी मारत आहे. मात्र असा वळसा का याचे उत्तर बस वाहकाकडे आणि चालकाकडेही नाही.

शहरांतर्गत वाशी कोपरखैरणे हा नवी मुंबईतील सर्वात्र जास्त वाहतूक असलेला मार्ग आहे. या मार्गावर सेक्टर ९/१० मार्केट, जुहू गाव, रा.फ. नाईक, सेक्टर १५ नाका हे हमखास वाहतूक कोंडी असणारी ठिकाणे आहेत. सणांच्या वेळेस तर येथून गाडी घेऊन जाणे एक दिव्य वाहनचालकांना वाटते. वाशी डेपो ते तीन टाकी हे सुमारे अंतर अडीच ते तीन किलोमीटर असून यासाठी गर्दी नसताना किमान २० मिनिटे तर गर्दीच्या वेळी पाऊण तास आणि ऐन सणांचा दिवस असेल तर याहीपेक्षा अधिक वेळ लागतो. वाहनांची प्रचंड संख्या बेशिस्त वाहतूक त्यात बेशिस्त पार्किंग आणि प्रवाशाने हात केला की अचानक थांबणाऱ्या रिक्षा ही प्रमुख कारणे आहेत. मात्र आता वाशीहून कोपरखैरणेला येतात या समस्येत भर पडली आहे.

हेही वाचा…करंजातून निर्यात होणाऱ्या शेवंड आणि खेकड्यांची दरवाढ, शेवंड २ हजार तर खेकडा २ हजार ६०० रुपये किलो

जुहू गाव येथे अनेक वर्ष रखडलेले मनपाच्या व्यापारी संकुल इमारतीत एनएमएमटी एका बाजूने प्रवेश करत दुसऱ्या बाजूने निघते. ही वेळ केवळ १५ ते २० सेकंद असते मात्र गर्दीतून या इमारती कडे वळताना आणि बाहेर पडल्यावर मुख्य रस्त्यावर येऊन मार्ग क्रमण करण्यासाठी किमान ५ ते दहा मिनिटे लागतात. त्यात या इमारतीत बस का वळसा घातले याबाबत अनेक वाहक चालकांना माहिती विचारण्यात आली मात्र त्याबाबत कुणालाच माहिती नाही. ही आमचीही डोकेदुखी आहे मात्र साहेबांनी सांगितले म्हणून ऐकावे लागते, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, एनएमएमटी व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी याबाबत पूर्ण माहिती घेऊन कळवले जाईल, असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनपा व्यापारी संकुलाच्या दोन्ही बाजूंनी असलेले बस थांब्यातील अंतर सुद्धा पायी दोन ते पाच मिनिटांचेही नाही त्यामुळे बस आत का जाते हे कोडे आम्हाला पडले आहे.अंजली उमापूरकर, प्रवासी