पनवेल शहरामध्ये नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम सेवेची ७५ क्रमांकाची बस धावू लागल्यानंतर पनवेल रेल्वेस्थानक ते करंजाडे नोड या मार्गावर नवीन बससेवा कधी सुरू होणार याबाबत प्रवाशांमध्ये प्रतीक्षा कायम आहे. दिवाळीच्या सुट्टय़ा संपवून एनएमएमटीचे चालक आणि वाहक कामावर हजर झाल्याने डिसेंबर महिन्यात या मार्गावर बससेवा सुरू करणार असल्याचे आश्वासन एनएमएमटीकडून देण्यात आले आहे. ही बससेवा सुरू झाल्यास करंजाडे व टपालनाका या परिसरातील प्रवाशांना अवघ्या सात रुपयांमध्ये रेल्वेस्थानक गाठता येईल.
पनवेल शहरामध्ये एनएमएमटी प्रशासनाने ९ ऑक्टोबरला बससेवा सुरू केली. या बससेवेचा आतापर्यंत ५८ हजार प्रवाशांना लाभ झाला आहे. तसेच या बससेवेमुळे सुमारे ५ लाख रुपयांचा महसूल एनएमएमटीच्या तिजोरीत जमा झाला. ही बससेवा सुरू व्हावी म्हणून सीटीझन युनिटी फोरम या पनवेलच्या संघटनेने सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र सव्वा महिना उलटला तरीही पनवेलच्या इतर मार्गावर एनएमएमटीची बससेवा सुरू होऊ न शकल्याने पनवेलच्या प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी ७५ क्रमांकाच्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून शहरातील इतर मार्गावर ही बससेवा सुरू करू असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र सव्वा महिन्यांत ७५ क्रमांकाच्या बससेवेला मिळालेला उदंड प्रतिसाद मिळूनही नवीन मार्गावर बससेवा सुरू का केली नाही याबाबत शहरात चर्चा सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील काही सदस्यांनी नवी मुंबई पालिका क्षेत्रातील प्रवाशांना आधी एनएमएमटीचा लाभ मिळू दे त्यानंतर पनवेलकडे लक्ष केंद्रित करा असेही मत मांडले जात आहे. यामुळे पनवेलमधील नवीन मार्गावर एनएमएमटीची बससेवा धावेल का असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे. एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड हे सुटीवर असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दिवाळीमुळे एनएमएमटीचे अनेक कर्मचारी सुटीवर गेले होते. ते आता परत आले आहेत. तसेच नवीन भरती झालेल्या कामगारांचे महिनाभराचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते कर्मचारीही प्रत्यक्ष कामात जोडले जातील. सध्या एनएमएमटीचे व्यवस्थापक आरदवाड साहेब सुटीवर आहेत, २३ तारखेला आल्यावर पनवेल शहरातील नवीन मार्गावर बससेवा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
– भानूदास वीर, वाहतूक अधीक्षक, नवी मुंबई महापालिका परिवहन
