घरी सोडण्याआधी करोना चाचणी करण्याच्या मागणीला पनवेल पालिका क्षेत्रात जोर
नवी मुंबई : पनवेल पालिका हद्दीतील करोना संसर्गामुळे दगावलेल्या १२१ जणांपैकी २२ जण हे कळंबोलीतील आहेत. यातील एका दाम्पत्याचा मृत्यू हा करोना उपचार पूर्ण करून घरी पाठविल्यानंतर झाला होता. त्यातही घरी गेल्यानंतर नव्याने उद्भवणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडून नव्याने करोना अहवाल मागितला जातो. त्यामुळे रुग्णांवर उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यापूर्वी चाचणी करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पालिकेने वेगवान मोहीम राबवली आहे. यात बाधित सापडल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपाय सुरू करण्यात येतात आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींना संशयित म्हणून अलगीकरण कक्षात ठेवले जाते. या प्रक्रियेनंतर रुग्णाला करोनामुक्त घोषित केले जाते. रुग्णाला घरी पाठविल्यानंतर पालिका आरोग्य विभागाचा रुग्णाशी कोणताही संपर्क राहत नाही वा त्याच्याशी कोणताही संवाद साधला जात नाही. घरी परतल्यानंतरही रुग्णांची काळजी घेणे आवश्यक आहे.
कळंबोली सेक्टर-५ मधील ‘केएल-वन’ येथे राहणारे आणि बेस्टमध्ये सेवेत असलेले कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीला लागण झाली होती. पालिका आरोग्य विभागाच्या वतीने दिलेले उपचार घेऊन घरी परतल्यानंतर या कर्मचाऱ्याच्या पत्नीचा पहिल्यांदा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
सध्या पालिकेकडे करोना चाचणी करण्याची यंत्रणा मुबलक आहे. त्यामुळे पालिकेने रुग्णांना घरी सोडण्यापूर्वी चाचणी केल्यास त्यानंतर उद्भवलेल्या आजारांसाठी इतर वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर त्या व्यक्तीकडे पुन्हा अहवालाची अट घालणार नाहीत, असा मुद्दा पालिका सदस्य विजय खानावकर यांनी उपस्थित केला आहे.
अहवालाअभावी उपचार नाहीत
कळंबोली येथील ‘ई वन’ येथे राहणारे एक जेष्ठ नागरिक आणि त्यांच्या पत्नीचा २१ दिवसांपूर्वी चाचणी सकारात्मक आली होती. कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना इंडिया बुल्स इमारतीतील काळजी केंद्रात ठेवण्यात आले होते. औषधोपचारांनंतर त्या दाम्पत्याला घरी सोडण्यात आले. सोमवारी रात्री संबंधित ज्येष्ठ नागरिकाला हदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. कोविड उपचार झाल्यामुळे नजीकच्या रुग्णालयाने कोविड रुग्णालयात जाण्याचे सुचविले. मात्र पालिकेने जाहीर केलेल्या कोविड रुग्णालयात गेल्यावर त्यांची तपासणी दरम्यान कोविड उपचारांनंतर अहवाल नसल्याने पुढील शस्त्रक्रिया करू शकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टर आहे, यंत्रणा आहे आणि खाटाही उपलब्ध आहेत. परंतु, उपचार होत नाहीत, अशी परिस्थिती दोन दिवसांपासून या रुग्णासह त्याचे नातेवाईक अनुभवत आहेत.
शासन आदेशानुसार ज्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे, त्यांच्यावर १० दिवसानंतर पुन्हा चाचणीची आवश्यकता नाही. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग चाचणी करीत नाही. नागरिकांना ती करायची झाल्यास खासगी प्रयोगशाळेत जाऊन करावी.
-संजय शिंदे, उपायुक्त पालिका आरोग्य विभाग
